भाजपाला नाही जमले, पण पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहर भयमुक्त केले – थर्ड आय – अविनाश चिलेकर

10

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (केपी) हे एक अजब रसायन दिसते. असा सच्चा पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवडकरांना प्रथमच पहायला मिळाला. एकाही राजकारण्याला भिक घालत नाही आणि कोणाहीपुढे झुकत नाही. कोणी एखादा घरचा भेदी असेल तर त्याला तत्काळ घरचा रस्ता दाखविण्याचे धाडस ते करतात. पोलिस डिपार्टमेंटची भ्रष्ट, कामचुकार, मांडवली बहद्दर, हप्तेखोर, गुन्हेगारांचे साथीदार अशी जी अत्यंत वाईट, बदनाम प्रतिमा आहे ती बदलण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे. शहरातील घाण (काळेधंदे) साफ करताना त्यांनी स्वतःचे घरसुध्दा साफ करायची जी मोहीम सुरू केली त्याचे तमाम जनतेने थाळ्या वाजवून, घंटनाद करून स्वागत केले पाहिजे. कोरोना पेक्षाही गुन्हेगारीची महामारी मोठी आहे, म्हणून अशा पध्दतीने केपी च्या कामाला सलाम करून त्यांच्या मागे समाजाने ठामपणे उभे राहिले पाहिजे. आजवर जे झाले नाही, पाहिले नाही ते आता दिसत असल्याने लोक खूश आहेत.

गुन्हेगारांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन –
आजची ताजी घटना त्यादृष्टीने खूपच महत्वाची वाटते.
पिंपरी पोलीस स्टेशनचे गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि पोलीस उपनिरीक्षक एस.एस. जाधव यांचे पोलीस आयुक्तांनी निलंबिन केले. वाहन तोडफोडीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळावा तसेच तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले. कलम ३०७ चा गुन्हा ३२४ मध्ये कन्व्हर्ट केला. त्यामुळे आरोपी सहिसलामत सुटले. नेहरूनगर येथे सुमारे १०० जणांच्या टोळक्याने हातात लाठी, काठी, तलवारी, कोयते घेऊन दहशत निर्माण केली, तोडफोड केली. याच टोळक्याने एका व्यापाऱ्यालाही बेदम मारहाण केली होती. धक्कादायक बाब म्हणजे या तोडफोडीचा सुत्रधार हा शहरातील एका बड्या नेत्याचा मुलगा होता. त्यावेळी त्याचा गवगवा झाला होता, पण अखेरपर्यंत नेत्यांच्या मुलापर्यंत पोलिसांना पोहचता आले नाही, की पोहचलेच नाहीत. या प्रकऱणात स्वतः पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. ती १०० मुले, ती वाहने मला पाहिजेत असे वारंवार सांगूनही पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी दुर्लक्ष केले. सीसी फुटेजमध्ये भले मोठे टोळके दिसत असताना फक्त २४ मुलेच पकडली आणि केस कमकुवत केल्याने सर्व आरोपिंना जामीन मिळाला. या सर्व घडामोडीत मोठी मांडवली झाल्याची तक्रार पोलिस आयुक्तांच्या कानावर गेली होती. पोलीस उपनिरीक्षक एस.एस.जाधव यांनीदेखील दरोड्याचा गुन्हा दाखल असताना आरोपीवरील कलम कमी होण्याकरिता किरकोळ कलम लावून तसा अहवाल न्यायलायत सादर केला होता. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी त्यांच्याकडे लेखी खुलासा मागवला होता. त्यात ते दोषी आढळले असून त्यांना देखील निलंबित करण्यात आले. अगदी महिन्यपूर्वीच पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र जाधव यांना एका महिलेच्या विनयभंग तक्रारीत फेरफार केली म्हणून सस्पेंड केले. आता दुसरी मोठी कारवाई केली. चिल्लर नाही तर घाऊक कारवाई झाली. त्यामुळे आता पूर्ण डिपार्टमेंटमध्ये जे कोणी तसे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांची अक्षरशः तंतरली आहे.

पोलिसांवरचा विश्वास वाढविणारी कारवाई –
पोलीस म्हटले की फिर्यादीकडूनही खाणार आणि आरोपिकडूनही पैसे उकळणार अशी वदंता आहे. त्यामुळे चोरी झाली तरी कोणी सहसा पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको म्हणतात. विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपली होती. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आल्यापासून रोजच्या बातम्या वाचून सामान्य नागरिक हरखून गेला आहे. अवघ्या १०० दिवसांत एकूण एक दारु धंदे, गुत्ते, मटका, जुगार अड्डे, गांजा, चरस बरोबरच मेफेड्रॉन, एमडी सारखे अंमली पदारर्थाचा धंदा करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या. चोरी, दरोडेखोरी करणाऱ्यांच्या टोळ्या, गुंडांच्या टोळ्यांचा बंदोबस्त केला. एमआयडीसी तील खंडणीखोरांनाही चाप लावला. तब्बल १५-२० कोटींचा मुद्दे माल, सुमारे ५५० वर आरोपींना कोठडित डांबले. आजवर हे कधीही झाले नाही म्हणून लोक पोलिसांवर चिडून होते. यापूर्वी पदमनाभन् नंतर संदीप बिश्णोई असे दोन पोलीस आयुक्त येऊन गेले. त्यांना हे करता आले नाही, कारण हप्तेखोरी आणि जोरदार वसुली सुरू होती. एका पोलिस शिपायाने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून या शहरातून तब्बल ५० कोटींचा हप्ता पोलिसांना जातो असा गौप्यस्फोट केला होता. त्या पत्राची चौकशीही कृष्ण प्रकाश यांनी थेट सीबीआय कडे सोपविली. पुढे काय झाले ते अद्याप गुलदस्त्यात आहे. पण इतकी मोठी हप्तेखोरी आणि त्याशिवाय जमिनींचे ताबे मारणे, दलाली अशा प्रकरणात किमान १०० कोटी रुपये पर्यंत सेटलमेंटमधून वसुली व्हायची असे पोलिसांचे खबरेच सांगतात. म्हणजे पोलिसांच्या तब्बल १५०-२०० कोटींच्या काळ्या कमाईवर कृष्ण प्रकाश यांनी बुलडोझर चालवला. केपींच्या खिशात गीता आणि हनुमान चालीसाची छोटी प्रत कायम असते असे म्हणतात. त्यामुळेच म्हटले हे रसायन वेगळेच आहे, इतके मोठे धाडस तेच करू शकतात. केपी यांच्या बरोबर डॉ. सागर कवडे यांच्या सारख्या तटस्थ आणि न्याय्य भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आता पोलीसांबद्दल थोडा भरोसा वाटू लागला आहे. राजकारणाचा जुगार खेळणाऱ्यांना केपी आता थेट हात घालतात का, याची लोकांना प्रतिक्षा आहे. त्यांना शुभेच्छा.

WhatsAppShare