भाजपाने आता शवासन करावे …

36

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आता शवासन करावं, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे राऊतांच्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर हा हल्ला चढवला. आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. त्यामुळे भाजपसाठी तुम्ही कोणतं आसन सूचवाल?, असा सवाल मीडियाने राऊतांना केला. त्यावर ‘शवासन’ असं राऊत म्हणाले.

माझं नाव संजय –
आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात आम्ही मोडत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आज आम्ही राजकारणात नाहीये. एक जमाना लोटलाय. पांढरे झाले. परत काळे करत आहोत. फार फार काय कराल, तुरुंगात टाकाल. आमची तयारी आहे तुरुंगात जायला. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

देशातील आदर्श समन्वय –
आम्ही सत्तेत असल्याने काही लोकांची पोटदुखी वाढली आहे. त्यांनी काहाही कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी सरकार पाच वर्षे चालणारच, असं सांगतानाच आघाडीतील तिन्ही पक्षाचा उत्तम समन्वय आहे. आघाडी सरकारचा समन्वय कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. हा देशातील आदर्श समन्वय आहे, त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांशी घट्ट नात्याने जोडले आहेत. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाचा विस्तार करतो. आम्हीही करत असतो. काँग्रेस-राष्ट्रवादीही करत आहे. पक्षाचा विस्तार केला पाहिजे. पण कोणी कोणत्या पद्धतीने लढायचं हे अद्याप ठरायचं आहे. तसेच हे सरकार पाच वर्ष चालवायचं ही तीन पक्षाची कमिटमेंट आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच सरकार चालवण्याचा पाया आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेत गटबाजी नाही –
सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा आहे. त्याचा राऊत यांनी इन्कार केला. शिवसेनेत एकच ग्रुप आहे. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही. कोणतेही गट नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरनाईकांच्या मागे संपूर्ण शिवसेना –
सरनाईक त्रासात आहेत अडचणीत आहेत. त्यांचं कुटुंब अडचणीत आहे. त्याचं कारण पत्रात दिलं आहे. भाजप विनाकारण त्रास देत आहे असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावं, असं ते म्हणतात. ते त्यांचं मत आहे.पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरे घेत असतात. त्यांचा विनाकारण त्रासातून मुक्तता कशी करायची हे आम्ही पाहू, असं सांगतानाच संपूर्ण शिवसेना सरनाईक यांच्या कुटुंबाच्या पाठिशी उभी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

WhatsAppShare