भाजपात बुजुर्ग नेत्यांना महत्व नाही; पण त्यांच्या अस्थींना महत्व – उद्धव ठाकरे

216

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश यात्रेवरून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. अटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यास्पद राजकारण सुरू असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. वाजपेयी हे अजातशत्रू होते. ते भाजपा, संघ परिवाराचे होते. संपूर्ण देश त्यांचा होता वते देशाचे होते. पण सध्या त्यांच्या अस्थिकलशावरून होणार हास्यास्पद राजकारण कोणालाच शोभणारे नाही. भाजपात बुजुर्ग नेत्यांना महत्व राहिलेले नाही, पण त्यांच्या अस्थींना महत्व मिळत असल्याचा टोलाही लगावला आहे. सध्या भाजपातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मिळत असलेल्या वागणुकीवरही या माध्यमातून सेनेने भाजपावर शरसंधान साधले.

अटलजींचे अस्थिकलश दर्शन व विसर्जन ज्या गांभीर्याने तसेच श्रद्धेने व्हायला हवे होते तसे घडताना दिसले नाही. अस्थिकलश हाती घेऊन विजयी ट्रॉफी उंच करावी तसे फोटोसेशन काही ठिकाणी करण्यात आले. विश्वचषक जिंकल्याचे हावभाव मंत्र्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. निधनानंतर देशात दु:खाचे वातावरण निर्माण झाले असताना त्याचा राजकीय व्यापार सुरू असल्याचे मत वाजपेयींच्या नातेवाईकांनी व्यक्त केले होते, हे अत्यंत गंभीर असल्याची खंत शिवसेनेने आपल्या ‘सामना’या मुखपत्रातून व्यक्त केली आहे.