भाजपाचे आंदोलन ही नौटंकी; पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची टीका

66

पिंपरी , दि. २१ (पीसीबी) :- संपूर्ण महाराष्ट्र आणि पिंपरी-चिंचवड शहर कोरोनामुळे अडचणीत आलेले असताना मोदी भक्तांनी आपले मानधन मुख्यमंत्री निधीला देण्याऐवजी पंतप्रधान निधीला देऊन महाराष्ट्राशी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांशी द्रोह करणार्‍या भारतीय जनता पक्षाने राज्य शासनाविरोधात आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमाविला आहे. महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या आडून आपल्या बगलबच्च्यांना सांभाळण्यासाठी आंदोलनाची नौटंकी भाजपाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून भाजपाला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा संतप्त शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपावर टीका करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनावर प्रहार केला. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, जावेद शेख, पंकज भालेकर, सुलक्षणा शिलवांत, युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना वाघेरे म्हणाले, भाजपाने जे आंदोलन हाती घेतले आहे तेच मुळत: हास्यास्पद आहे. संपूर्ण राज्य करोनामुळे हैराण आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्री कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत 11 हजारांहून अधिक नागरिक बरे होऊन घरी गेले आहेत. मोफत अन्नधान्य, क्वारंटाईन नागरिकांना सुविधा देण्याबरोबरच आरोग्य व वैद्यकीय सुविधा प्रत्येक व्यक्तीपर्यंत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राज्यातील आरोग्य, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले लाखो कर्मचारी अहोरात्र मेहनत करीत आहे. मात्र भाजपाच्या नेत्यांना यामध्येही राजकारण सुचते ही बाबच दुर्देवी आहे.

राज्य आर्थिक अडचणीत असतानाही राज्याची तिजोरी जनतेसाठी खुली करून आरोग्य व वैद्यकीय सुविधा, अन्नधान्य आणि रेशनधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र विरोधासाठी विरोध करणार्‍या भाजपाला आणि राज्यपालांना या महामारीमध्येही राजकारण करण्याचा मोह आवरता येत नाही. आजपर्यंत या पक्षाच्या माध्यमातून करोना अटोक्यात आणण्यासाठी एकही उपाययोजना केली नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. या महामारीमध्येही हे लोक पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदारनोंदणीसाठी नगरसेवकांकडे आग्रही आहेत. शहरातील कोरोना बाधितांसह नागरिकांच्या सुविधांसाठी प्रत्येकाने आज काम करण्याची गरज असताना आंदोलन आणि राजकारण करण्यातच यांना धन्यता वाटत आहे.

केंद्र शासनाकडे अनुदानापोटी राज्याचा कोरोडो रुपयांचा निधी थकला आहे मात्र त्याबाबत यांचे नेते एक ब्र शब्द काढत नाहीत. उलट यांचे नगरसेवक, आमदार राज्याशी द्रोह करून पंतप्रधान निधीला येथील जनतेच्या पैशातून मिळालेले मानधन देत आहेत. येथील जनतेचा पैसा येथेच वापरण्यात काय हरकत होती? मात्र यांना अंध मोदीभक्तीपुढे राज्यातील जनतेची दुख: दिसत नाहीत. महाराष्ट्रापेक्षा सहा कोटींनी लोकसंख्या कमी असलेल्या गुजरातमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. मात्र त्याबाबत यांच्या देशातील आणि राज्यातील नेत्यांना गुजरातमध्ये सर्वकाही अलबेल दिसत आहे. केवळ मोदी आणि शहांना खुश करण्यासाठी आंदोलनाची नौटंकी सुरू असून येथील जनता भाजपाचे हे इव्हेंट ओळखून असल्याचेही वाघेरे म्हणाले.

WhatsAppShare