भाजपला दुसऱ्यांच्या मुलांना कडेवर घेऊन फिरण्याची हौस – राज ठाकरे

94

औरंगाबाद, दि. १९ (पीसीबी) – भाजपवाले रोज खिडकीत बसतात आणि तू येतो का, असे दुसऱ्या पक्षातील लोकांना विचारत बसतात. त्यांना दुसऱ्यांच्या मुलांना कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली. त्रिपुरातही भाजपचा विजय हा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्याने झाला. पण संघाच्या ४० वर्षांच्या मेहनतीमुळे हा विजय शक्य झाल्याचा खोटा दावा भाजपकडून केला जात आहे, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.  

राज ठाकरे आज (गुरूवार) औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की,  मोदी टुर्स अँड ट्रॅव्हल्सने परदेशवारी केल्या. पण परदेशातून एकही रुपया देशात यायला तयार नाही. आता निवडणुका जिंकणे कठीण दिसत असल्याने भाजपकडून राम मंदिराचा विषय पुढे रेटला जात आहे. दंगली घडवून सत्तेत येण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

भाजप नुसतं खोटं बोलणार पक्ष आहे. पैसा आणि ईव्हीएमच्या जिवावरच हा पक्ष निवडून येत आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन बंद करुन पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे. मग भाजपला त्यांचा जागा कळेल, असा हल्लाबोल राज यांनी यावेळी केला.