भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांची वेटींग लिस्ट तयार – रावसाहेब दानवे

143

जालना, दि. २ (पीसीबी) – शिवसेनेच्या त्रासाला कंटाळून अनेक शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार आहेत. त्या शिवसैनिकांची वेटींग लिस्ट तयार आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. जिल्ह्यातील प्रमुख नेता शहरात नसताना शिवसेनेचा विभागीय मेळावा होतो. याचा अर्थ शिवसेनेत मंत्र्यांना किंमत नाही, अशा शब्दात दानवे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली.  

जालन्यात विविध विकासकामांचे उद्‌घाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार दानवे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शहरात ज्यांची सत्ता होती त्यांनी आतापर्यंत विकासाकडे दुर्लक्ष  केले. भाजपची सत्ता आल्यानंतर शहरात ५५ कोटी रुपयांचे सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून  १५० कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. जालना-वडीगोद्री रस्त्यासाठी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात ६ हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याचे दानवेंनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात गेल्या चार वर्षात विकासकामे करण्यात कमी पडलो असेल, तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे. मात्र, विरोधक कमी पडले तर त्यांनीही जनता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार राहावे, असे दानवे म्हणाले.