भाजपने विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली नसल्याने आपण नाराज- आठवले

63

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – सत्ताधारी भाजपने विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली नसल्यामुळे आपण नाराज असल्याचे रिपाइं आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्षाची नाराजी त्यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘मागील विधानसभा निवडणुकीत महायुती करताना रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सहभाग देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिपाइंला राज्यात एक मंत्रिपद, विधान परिषदेची एक जागा आणि महामंडळांची पदे देण्याचे आश्वासन दिले होते. आता परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत आठवले गटाला भाजपने एकही जागा न सोडल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत’, असे आठवले म्हणाले. मात्र, ‘रिपब्लिकन पक्षाला ६० वर्षानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून, आपल्याला मिळालेले केंद्रीय राज्यमंत्रीपद हे आपले वैयक्तिक नसून सर्वसामान्य गोरगरीबांचे मंत्रिपद आहे’, असे म्हणत, या पदाची जबाबदारी देऊन मित्रपक्षाचा सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आठवले यांनी आभारही मानले.