भाजपच्या मेळाव्यात सोशल डिस्टंन्सिंग, मास्क वापराचा पूरता  फज्जा, नेत्यांसह बहुसंख्या कार्यकर्त्यांकडून नियम धाब्यावर – आता पोलीस काय कारवाई करणार…

8

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळे सौदागर याथील गोविंद गार्डन मध्ये आयोजित मेळाव्यात सोशल डिस्टंन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. मंचकावर सर्व नेते एकमेकांना खेटून बसले होते आणि अपवाद वगळता कोणीही मास्क घातलेला नसल्याचे आढळले. कुठल्याही कार्यक्रमाला ५० पेक्षा अधिक उपस्थितीला बंदी असताना नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ५०० ते ६०० उपस्थिती होती. दरम्यान, मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रुपये दंडात्मक कारवाई करणारे पोलीस आणि महापालिका कर्मचारी आता या मेळाव्याबद्दल कोणावर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना च्या पार्श्वभूमिवर देशभरातील नागरिकांना काही नियम पाळण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे. कोरोना अद्याप आपल्यात आहे, गेलेला नाही असे त्यांनी गेल्याच आठवड्यात जाहीर निवेदनात सांगितले. प्रत्यक्षात त्यांच्याच पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याचा आदेश धाब्यावर बसवला आहे. मास्क वापरा, दोन व्यक्तींमध्ये दोगज दुरी अंतर राखा, गर्दी करू नका असे साधे नियम सर्वांसाठी आहेत. प्रत्यक्षात गोविंद गार्डनचे ५०० क्षमतेचे सभागृह अक्षरशः हाऊसफूल्ल होते. व्यासपीठावर स्वतः पाटील, आमदार, महापौर, पक्षाचे पदाधिकारी शेजारी शेजारीच बसलेले होते. मेळावा संपल्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रमासाठीही अक्षरशः रेलचेल सुरू होती. ऐकमेकांशी संपर्क करताना नमस्कार ऐवजी हात मिळवून गाठीभेटी तसेच एकत्र बसून गप्पांचे फडही रंगले होते. कोरोना प्रसार होण्यासाठी हे सर्व कृत्य कारणीभूत ठरू शकते, असे आढळले.

 

पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विधानभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना बाधा झाल्याचे वृत्त येऊन धडकले. धक्कादायक प्रकार म्हणजे फडणवीस आणि पाटील हे गेले काही दिवस सहवासात होते, त्यामुळे खळबळ आहे. पाटील यांनी भाषण संपताच काढता पाय घेतला. कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, पण ती रद्द करून पाटील हे तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद रद्द झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि पाटील हे कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले.

WhatsAppShare