भाजपच्या काही विद्यमान खासदारांचा पत्ता गुल होणार; सुधीर मुनगंटीवार यांचे संकेत

86

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – भाजपच्या एखाद्या खासदाराला जनमानसात विरोध होत असेल, तर त्या खासदाराचे तिकीट कापले जाणार असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपकडून काही विद्यमान खासदारांचा पत्ता गुल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची भाजपची पहिली यादी शनिवारी (दि. १६) जाहीर होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

भाजप उमेदवारांची पहिली यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे. त्यामध्ये १७ ते १८ उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातील सात उमेदवार असतील. दिल्लीत संसदीय बोर्डाच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि संघटन मंत्री विजय पुराणिक हजेरी लावणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी गुरूवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे आमदार व खासदार उपस्थित होते. त्यानंतर प्रचार समितीचीही बैठक झाली. तसेच लोकसभा मतदारसंघ प्रमुख, राज्यसभा खासदार आणि विधान परिषद आमदारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.