भाजपची हायटेक व्हर्च्युअल रॅली

64

नागपूर, दि. १ (पीसीबी) : लॉकडाऊनमधून हळूहळू शिथीलता मिळत असताना आता भाजपने मेगाप्लॅन तयार केला आहे. भाजप आता राज्यभर लवकरच हायटेक रॅली सुरु करणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. या प्लॅननुसार, भाजप राज्यातील पाच लाख कुटुंब आणि 25 लाख लोकांपर्यंत पोहोचून, केंद्राने महाराष्ट्राला दिलेल्या मदतीची माहिती देणार आहे.
तब्बल 25 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं भाजपचं नियोजन आहे. केंद्रातील पॅकेजमधून काय मिळालं आणि काय हवं याबाबत भाजप व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे.

केंद्रातील आणि राज्यातील नेते या व्हर्च्युअल रॅलीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सहा विभागात ही व्हर्च्युअल रॅली घेण्यात येणार आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात लवकरच या रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्हर्च्युअल रॅलीची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपचं राज्य सरकारवर टीकास्त्र
दरम्यान, भाजपने राज्यातील कोरोना संसर्गावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत, मात्र योग्य वैद्यकीय सुविधा लोकांना उपलब्ध होऊ शकत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. “देशात एकूण उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 41 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांची फेकाफेकी महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

WhatsAppShare