भाजपची साथ सोडल्यास शिवसेनेशी युती करण्याचा विचार – राजू शेट्टी

65

अहमदनगर, दि.२८ (पीसीबी) – यापुढे भाजपबरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, असे स्पष्ट करून शिवसेनेने केंद्रात व राज्यातील भाजपची साथ सोडल्यास त्यांच्याशी युती करण्याचा विचार केला जाईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

तिसगाव (ता. पाथर्डी) येथे शेतकरी मेळावा झाल्यानंतर खासदार शेट्टी नगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्‍न हाताळण्यात यश आलेले नाही. कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करण्याचा संतापजनक प्रकार घडत आहे. याबाबत सरकारने कडक पावले उचलल्याचे दिसत नाही. अधिकाऱ्याला केवळ एक दिवसाची पोलिस कोठडी मिळते, याचा अर्थ काय ? मुख्यमंत्र्याचे गृहखाते काय करतेय ?असा सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

शेट्टी पुढे म्हणाले की, राज्यातील दुध उत्पादकांना कर्नाटकच्या धर्तीवर ५ रुपये प्रती लिटर अनुदान देण्यात यावे. उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम मिळण्यासाठी २९ जून रोजी कैफियत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शेट्टींनी यावेळी सांगितले.