“भाजपची अवस्था ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ'”- थर्ड आय – अविनाश चिलेकर

305

पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांच्या लाचखोरीचे प्रकरण संपले असे वाटत होते. प्रत्यक्षात समितीच्या सर्व सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) टक्केवारीच्या प्रकऱणात जाबजबाब नोंदविण्यासाठी हजर होण्याची नोटिस काढल्याने पुन्हा खळबळ उडाली. या एका प्रकऱणामुळे भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्वांचीच अब्रू गेली. त्यातल्या त्यात सत्ताधारी भाजपाची पूरती नाचक्की झाली. भाजपा नागवली गेली, वस्त्रहरण झाले. याच मुद्यावर भाजपाच्या सत्तेला आता ग्रहण लागल्यासारखे झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपा हा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा नाही तर, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा आहे, हे यातून सिध्द झाले. महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, पण सत्तेत `तो` भाजपा कुठेही दिसत नाही. भाजपाची ध्येय, धोरणे, आचार, विचारांचा इथे मागमूसही नाही. संघ संस्काराची शिस्त, शिदोरी घेऊन आयुष्य समर्पन करणारा एक नेता की कार्यकर्ता या टोळीत, होय टोळीत शोधूनही सापडत नाही. राष्ट्र, धर्म, संघटन (पक्ष) आणि शेवटी व्यक्ती हा भाजपाचा आजवर ५० वर्षांचा खाक्या. इथे आमदार हाच देव, आमदार हाच धर्म, आमदार हेच राष्ट्र आणि आमदार हाच पक्ष आहे. त्यामुळे आज व्यक्ती स्तोम इतके माजले की, या दोन आमदारांना वगळले तर भाजपासुध्दा शून्य आहे. भाजपामध्ये एका व्यक्तीचे मग तो वाजपेयी असो वा मोदी मर्यादेपलिकडे लाड होत नाहीत. व्यक्तीपेक्षा पक्ष, संघ, संघटना मोठी असते. पिंपरी चिंचवडकरांनी पाच वर्षांत पाहिले की भाजपाचे कातडे पांघरून पवार यांच्या तालमित तयार झालेलेच तुंबडी भरून घेतात. निती, तत्वांवर वाटचाल कऱणारा भाजपा या शहरात आता राहिलेला नाही. जो आहे तो नितीभ्रष्ट, सत्तालोलूप, ठेकेदारी, टक्केवारीच्या चक्रव्युहात गुंतलेला. मोदी, फडणवीस यांच्या नावाचे फक्त कुंकू लावून हा संसार सुरू आहे.

महापालिकेतील भाजपाच्या सत्तेला आता पाच वर्षे पूर्ण होतील. या पाच वर्षांत भाजपाने शहराला काय दिले हा मोठी प्रश्न आहे. भाजपाचा छाप कुठेही दिसत नाही. स्थायी समितीच्या लाचखोरीला उघड उघड पाठिंबा देणारे दोन आमदार आणि लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आपल्याच नगरसेविकेचा (आशा शेंडगे) पक्षनेत्यांनी निषेध केला तेव्हाच भाजपाचा चेहरा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, काळवंडला आहे, ते लोकांना दिसले. नैतिकतेला तिलांजली देणारा दुतोंडी म्हणा की डुप्लिकेट भाजपा पहायला मिळाला. ३०-४० वर्षांत शहरातील भाजपाचे अनेक नेते पाहिले. अनेकांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवले आणि समाजकारण केले. पक्षाच्या ध्येयधोरणांशी कधीही कुठेही तडजोडी केल्या नाहीत किंवा मांडवली केल्याचे दिसले नाही. आजही बोटावर मोजण्याएतके काही अपवादात्मक मधू जोशी, वसंत शेवडे, प्रतिभा लोखंडे, महेश कुलकर्णी, डॉ. गीता आफळे यांच्यासारखे पक्षासाठी आयुष्य वेचलेले हतबल कार्यकर्ते आहेत. शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाळेमुळे घट्ट आहेत. भाजपाचे इथले राजकारण पूरते सडलेले आहे, त्यावर संघानेसुध्दा हात टेकल्याचे दिसते. आज तुळशीतच भांगेची रोपे उगवल्याने भाजपाचे पावित्र संपले आहे. त्याची पुर्नस्थापना करायची असेल तर मोठी सर्जरी गरजेची आहे. लोकांना भाजपा हवा पण राष्ट्रवादी काँग्रेसयुक्त भाजपा नको आहे. असंगशी संग मृत्यूशी गाठ हा निसर्गाचा नियम आहे. केवळ सत्तेसाठी वाट्टेल त्या तडजोडी करत गेले आणि आज ही अवस्था झाली. संघटनेचा निव्वळ पोकळ डोलारा उभा आहे, तो केव्हाही कोसळेल. २२ नगरसवेक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, याचाच अर्थ होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही.

पक्षाचे संस्थापक दिनदयाळ उपाध्याय यांची जयंतीला पक्षाध्यक्ष म्हणून महेश लांडगे, महापौर, उपमहापौर, सत्ताधारी नेते वगळता, ७८ पैकी किती नगरसेवक उपस्थित होते याचा आढावा घेतला की संघटनेची अवस्था समजेल. पक्षाने आंदोलने केली त्यात मोजके तेच ते चेहरे सोडले तर एक नगरसेवक फिरकत नाही. पक्षाला आजही सर्वसमावेशक असे नेतृत्व सापडत नाही. आमदारांचा समर्थक असतो त्यालाच पद मिळते. जेष्ठता, निष्ठा याला काडिची किंमत भाजपामध्ये नाही. पक्ष पदाधिकायांच्या निवड, नियुक्त्या झाल्या त्यात पाहुणेरावळ्यांचीच भरती झाली. महापालिकेत पदे वाटताना पक्षाच्या कामाचा कमी विचार होतो आणि आमदारांच्या किती कामाचा याचा अधिक विचार असतो. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना पद, प्रतिष्ठा मिळविताना आजही हाजीहांजी करावी लागते. जुन्या नव्यांचा मेळ बसत नाही आणि आता बसणारही नाही. मोदी, फडणवीस यांचे समर्थक असलेल्यांनाही भाजपामध्ये किंमत नाही. केंद्रात मोदी सरकराने जे उपक्रम राबवले ते शहरात राबवावेत असे पदाधिकाऱ्यांना वाटत नाही.

गेली ५ वर्षे महापालिकेचे टेंडरिंग, ठेकेदारी, पोटठेकेदारी, निविदेतील रिंग, सेटींग याच्या पलिकडे भाजपाला काम जमले नाही. चिंचवड आणि भोसरीत शहराची विभागणी करून आमदारांनीच पक्षात दुफळी केली. वाकडच्या रस्त्यांचे टेंडरला खुद्द चिंचवडचे आमदार विरोध करतात. भोसरीकर आमदारांचे स्थायी समिती अध्यक्ष असताना त्याला खोडा घालायचे काम चिंचवडकर करतात. एकमेकांची जीरवण्यात भाजपाचे वांग झालं. कोरोना काळात भाजपाच्या नगरसेवकांची मास्क खरेदी, जेवणाचा ठेका यातील टक्केवारी उघड झाली. स्मार्ट सिटी सर्व पक्षीय सापडले. सेवा बाजुलाच राहिली, मेवा वाटून घेण्यात नगरसेवक दंग झाले. सुडाचे राजकारण सुरू झाले. आपल्याला विरोध करणाऱ्याचे काम आडव, त्याचे अवैध बांधकाम पाडायला सांग असले संकुचित राजकारण सुरू झाले. आशा शेंडगे यांच्यासारख्या भाजपा नगरसेविकेने आमदारांच्या भाच्याचे चुकिच्या कामाला विरोध केला तर, प्रशासनाच्या मदतीने शेंडगे यांना धडा शिकवायचे काम भाजपामधूनच झाले. आता स्मार्ट सिटीतील २०० कोटींचा भ्रष्टाचार उघड होतो आहे, आणि त्यात तमाम भाजपा नेते गुरफटलेत. राष्ट्रवादीच्या विरोधात भ्रष्टाचाराचा प्रचार करणाऱ्या भाजपाला आता प्रचारासाठी भ्रष्टाचार हा मुद्दा घेता येणार नाही. कारण नखशिखांत भ्रष्टाचारात भाजपा बुडाली आहे. गांधीयन सोशालिझमचा विचार भाजपा मांडतो, पण प्रत्यक्षात नथुरामचा विचार राबवतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नेत्यांच्या अहंमपणात भाजपाचे वाटोळे झाले. संघाची हाफ पॅन्ट घालून भाजपाचे असल्याचा कांगावा करणारे संघाचे कधी झाले नाही आणि भाजपाचे तर नाहीच नाही. स्थायी समितीमधील लोचखोरी ही भाजपासाठी उंटाच्या पाठिवरची शेवटची काडी ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग ४ सदस्यांचा असो वा २-३ चा भाजपाचे प्रतिमाभंजन इतके झाले आहे की, राष्ट्रवादी काय ९ नगरसेवकांची शिवसेनासुध्दा आता आमचाच महापौर होणार अशी फुशारक्या मारू लागली आहे. आयाळ झडलेल्या, दात पडलेल्या सिहांसारखी भाजपाची अवस्था झाली आहे. आता काळच त्यावरचे औषध आहे. तोवर जय श्रीराम.

WhatsAppShare