भाजपचीही स्वबळाची तयारी; राज्यात लोकसभेच्या ३० जागा जिंकून आणण्याची व्यूहरचना

1153

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ताधारी भाजपनेही निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती करून निवडणुका लढवण्यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. मात्र, शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत  स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे भाजपनेही  स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. भाजपने राज्यातील लोकसभेच्या ३० जागा जिंकून आणण्याची व्युहरचना केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही राज्यात  भाजप स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे म्हटले  होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत  युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे म्हटले होते. तसेच  शिवसेनेने कितीही टीका केली, तरी त्यास उत्तर न देण्याच्या सक्त ताकीद राज्यातील नेत्यांना दिली होती.

भाजप युतीसाठी तयार आहे,  परंतु शिवसेनेकडून त्यास प्रतिसाद न मिळाल्यास भाजपने  स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली  आहे, असे एका भाजप नेत्याने सांगितले. लोकसभेच्या   ४८ मतदारसंघांत निरीक्षक नेमले आहेत. ज्या ठिकाणी मते कमी पडत आहेत, त्या ठिकाणी   मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. राज्यात सत्तेवर आल्यानंतर महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपने चांगले वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे  ४८ पैकी ३० जागावर भाजप  स्वबळावर नक्कीच विजय मिळवू शकतो, असा दावाही भाजप नेत्याने केला.

सध्या विधानसभेच्या १०८ जागांवर भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. ज्या ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या जागांवर भाजपने लक्ष देण्याच्या सुचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.  त्यामुळे लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही भाजप स्वबळावर तयार असल्याचे संकेत भाजपने दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच होतील. निवडणूक आयोगानेही निवडणुका एकत्र घेणे शक्य नाही, असे म्हटले आहे. मात्र, पुढील काळात काहीही होऊ शकते, असेही भाजप नेत्याने सांगितले.