भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी कष्ट घ्या – रावसाहेब दानवे

137

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – भाजप पक्ष म्हणजे एक परिवार आहे. भाजपमध्ये काम करण्यासाठी पैसा आणि गोरा असणारा कार्यकर्ता असला पाहिजे, असे काही नसते. तर पक्षासाठी काम करणारा आणि निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. पक्षासाठी काम करत रहा, कधी कोणती संधी चालून येईल हे सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जेवढे कष्ट घेतले. तितकेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी कष्ट घ्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना आज (सोमवार) येथे केले.

पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानिमित्त व नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांचा पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना दानवे बोलत होते.

याप्रसंगी भाजपचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व  आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार योगेश टिळेकर, माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे,  महापौर राहुल जाधव,  माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, नगरसेविका आशा शेंडगे- धायगुडे, उमा खापरे, शैला मोळक, आदी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दानवे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. ज्या पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत पडतो, तो काँग्रेस पक्ष आता शिल्लक राहणार नाही. जनतेच आता काँग्रेसवर गरिबी आणली, असा टोला दानवे यांनी लगावला. पिंपरी–चिंचवड महापालिकेत ज्यांना झोपवले, त्यांना लोकसभा निवडणुकीत जोराचा फटका दिला, असा निशाणा दानवे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नांव न घेता त्यांच्यावर यावेळी साधला.

गिरीश बापट म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबाला घरी बसवून पिंपरी-चिंचवडने इतिहास केला आहे. पालकमंत्री पदावर असताना पिंपरी-चिंचवडमधून अधिक शिकायला मिळाले. मात्र, पिंपरी-चिंचवडला समजायला साडेचार वर्षे लागली, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. पिंपरी –चिंचवडमध्ये भाजपचे विचार आणि संघविचार रूजविण्यात विशेष करून महिला कार्यकर्तींचे योगदान मोठे आहे, असे बापट यावेळी म्हणाले.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, पिंपरी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी कोणतीही मदत करू, असे आश्वासन रावसाहेब दानवे आणि गिरीश बापट यांनी दिले होते. त्यांच्या सहकार्यामुळेच पिंपरी-चिंचवडमधून राष्ट्रवादीला हद्दपार करून सत्ता प्रस्थापित केली. दानवे आणि बापट यांनी असेच प्रेम आमच्यावर यापुढे ठेवावे. खासदार बापटांना  केंद्रात मंत्री करावे, म्हणजे आम्हीही मंत्री झाल्यासारखे होईल, असे आमदार जगताप म्हणाले.