भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करावे – महापौर माई ढोरे

63

पिंपरी, दि.७ (पीसीबी) : बदलत्या काळामध्ये तरुणांनी वर्तमान आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेवून नाविन्यपूर्ण कौशल्यासोबत विद्यार्थ्यांनी जुडवून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‍पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यामध्ये “स्कील डेव्हलपमेंट” अंतर्गत उपक्रम सुरु करण्यासंदर्भात सामजंस्य करार करण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या बॅचच्या उदघाटन समारंभ कार्यक्रमप्रसंगी महापौर माई ढोरे बोलत होत्या. ऑटो क्लस्टर, ऑडिटोरिअम, चिंचवड येथे आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, स्मार्ट सिटीचे संचालक प्रदीप कुमार भार्गव, अतिरिक्त आयुक्त (२) जितेंद्र वाघ, सिनेट सदस्य संतोष ढोरे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी निळकंठ पोमण, प्राचार्य शश‍िकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थ‍ित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अपुर्वा पालकर यांनी केले.

महापौर पुढे म्हणाल्या, स्मार्ट आणि इनोव्हेटिव्ह कोर्सेसच्या माध्यमातून उद्योगांना लागणारे आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून उपक्रमाद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार असून नोकरीच्या शोधात असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील युवकांसाठी नवनवीन कौशल्ये उपलब्ध करून देण्यात हा उपक्रम एकमेव ठरणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाला शुभेच्छा‌ दिल्या.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड हे शहर एक औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारुपाला आले आहे. येथील औद्योगिक क्षेत्रासाठी कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित मॉडयूल तयार करणे, हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उददेश्य आहे. आजच्या डिजीटल युगात ऑनलाइन माध्यमातून रोजगारनिर्मीती होत असून यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर (स्टिक) द्वारे सुरु करण्यात आलेला हा उपक्रम एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये (SAP Careers ABAP), (SAP Careers MM), (Microsoft Cloud Admin), (Linux Administration) या चार कोर्सचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हददीतील अभियांत्रिकी, पदवीधर, विद्यार्थी, युवकांना पूर्ण वेळ रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्याच्या हेतूने हा अभ्यासक्रम घेण्यात आलेला आहे. खासगी संस्थांकडून या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना मोठी रक्कम मोजावी लागले. परंतु, हे सर्व कोर्स शहरातील विद्यार्थ्यांसाठी माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांकडून जमा होणा-या कोर्स फी मध्ये 70:30 या प्रमाणात हिस्सा असणार आहे. खासगी संस्थांकडून SAP Careers MM या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी र.रु. 3,25,000/- इतकी फी आकारली जाते. परंतु, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत विद्यार्थ्यांकडून र.रु.47,200/- इतकी कमीत कमी कोर्स फी घेण्यात येणार आहे. “स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर”च्या अंतर्गत येणा-या सॅप करीअर एबीएपी (SAP Careers ABAP) हा कोर्स २०० तासिकांचा असून या कोर्सची फी र.रु.47,200/-, सॅप करीअर एमएम (SAP Careers MM) हा कोर्स २०० तासिकांचा असून फी र.रु. 47,200/-, ऑटोकॅड (AutoCAD) – २०० तासिका, फी र.रु. 23,000/-, मायक्रोसॉफट क्लाउड ऍडमिन (Microsoft Cloud Admin) – तासिका १८०, फी र.रु.15,350/-, लिनक्स ऍडमिनिस्ट्रेशन (Linux Administration) – तासिका १८०, र.रु. 22,500/- अशी कोर्सनुसार फी आकारली जाणार आहे. सॅप करीअर एमएम (SAP Careers MM) या कोर्स साठी 26 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून पुणे विद्यापीठामार्फत या अभ्यासक्रमाची 18 विद्यार्थ्यांसाठीची पहिली बॅच आज रोजी सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन – ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाची अधिक माहिती www.sticonline.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाणा-या पुणे विद्यापीठातून दरवर्षी साडे सात लाख विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतात. त्यामुळे खूप मोठया प्रमाणात स्पर्धा वाढली असून आपल्या भागातील विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर जावू नये, यासाठी पुणे विद्यापीठ व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी पुढाकार घेतलेला आहे. “इंडस्ट्री ४.०” हे ध्येय डोळयासमोर ठेवत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने “स्मार्ट ट्रेनिंग आण‍ि इनोव्हेशन” सेंटर स्थापन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच काळानुसार अद्ययावत ज्ञान देण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग आण‍ि इनोव्हेशन सेंटर (स्टिक) व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळात हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच “गेम चेंजर” ठरतील. या नव्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक करणे गरजेचे आहे. अत्याधुनिक प्रशिक्षणामुळे जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाशी संबंधित नसलेल्या युवकांना देखील तांत्रिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी साधता येतील. नव्याने आत्मसात केलेली कौशल्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील, असेही कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे आभार मुख्य माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी निळकंठ पोमण यांनी मानले. दरम्यान, कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला शंभरहून अध‍िक विद्यार्थी- पालक उपस्थ‍ित होते.