भर रस्त्यात अडवून पादचारी तरुणाला बेदम मारहाण करत लुटले

67

मावळ, दि. २२ (पीसीबी) – पैसे ट्रान्सफर करण्यासाठी जात असलेल्या एका तरुणाला स्कॉर्पिओ मधून आलेल्या अज्ञातांनी भर रस्त्यात अडवले. तरुणाला बेदम मारहाण करून मोबाईल फोन आणि 20 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी मावळ तालुक्यातील सुदवडी येथे घडली.मुकेश रामशंकर कुमार (वय 21, रा. सुदवडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश कुमार हे तळेगाव एमआयडीसी येथे खाजगी नोकरी करतात. ते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मंगळवारी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास पायी चालत जात होते. ते सुदवडी गावातील विघ्नहर्ता ऑटो सर्व्हिस या गॅरेज समोर आले असता एका स्कॉर्पिओ कार मधून तिघेजण आले. त्यांनी मुकेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने मुकेश यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 20 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर आरोपी स्कॉर्पिओ कारमधून पळून गेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare