“भर दुपारी कडीकोयंडा काढून २ लाख ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला”

0

सांगवी, दि. २३ (पीसीबी) – जुन्या सांगवीत अज्ञात चोरट्यांनी एका घराचा कडी-कोयंडा तोडून घरातून दोन लाख 56 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी बारा ते चार वाजताच्या सुमारास ढोरेनगर, जुनी सांगवी येथे घडली.

विकी बाजीराव पाटील (वय 20, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील सोमवारी दुपारी बारा वाजता त्यांच्या मावशीच्या उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते. रुग्णालयातून ते दुपारी चार वाजता परत आले. त्यावेळी त्यांच्या घराचा कडी कोयंडा काढल्याचे दिसले.

दुपारी बारा ते चार वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा काढून घरात प्रवेश केला. घरातून अडीच लाख रुपये किमतीचे 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare