भय्यू महाराजांच्या मित्राचा पोलीस महानिरीक्षकांना फोन; आत्महत्येचे कारण माहिती असल्याचा दावा

186

इंदूर, दि. २७ (पीसीबी) – आध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांच्या आत्महत्येचे खरे कारण मला माहिती असल्याचा दावा भय्यू महाराजांच्या एका जवळच्या मित्राने पोलीस महानिरीक्षकांना  फोन करून केला आहे. डीआयजींनी त्या मित्राला भेटण्यासाठी बोलावले आहे. त्याचाही जबाब नोंदवला जाणार आहे.

भय्यू महाराजांचे कुटुंबीय आणि सेवेकरी आत्महत्येचे खरे कारण लपवत आहेत. त्यांच्याकडून तणावाचे कारण सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे पोलिस मुख्य कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच मंगळवारी भय्यू महाराजांच्या एका जवळच्या मित्राचा डीआयजींना फोन आला होता. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा जवळपास तपास पूर्ण झाला आहे. आता त्यांच्या व्हिसेरा आणि रिव्हॉल्व्हरची न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. दोन्ही अहवाल आल्यानंतर महाराजांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. भय्यू महाराज  यांनी १२ जून रोजी इंदुरातील आपल्या बंगल्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पत्नी, कन्या, आश्रम, नातेवाईक आणि सेवेकरी, डॉक्टर अशा एकूण २५ जणांचे जबाब घेण्यात आले आहेत.