भय्यूजी महाराज यांची दुसरी सुसाइड नोट बनावट ?

0
1223

इंदूर, दि. १४ (पीसीबी) – आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर दुसरी सुसाइड नोट आढळून आली होती. त्यातील हस्ताक्षर आधी सापडलेल्या सुसाइड नोटपेक्षा वेगळे आहे. तसेच दोन्ही सुसाइड नोट वेगवेगळ्या पेनने लिहिण्यात आल्या आहेत, असे इंदूर पोलिसांना तपासातून आढळून आले आहे.

दुसऱ्या सुसाइड नोटमध्ये भय्यूजी महाराजांनी आपली सर्व संपत्ती आणि बँक खात्यांचा मालकी हक्क आपला १५ वर्षे जुना विश्वासू सेवेकरी विनायकच्या नावे केला आहे. तथापि, या कथित सुसाइड नोटवरही संशय उपस्थित केला जात आहे. आधी मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये भय्यूजींनी तणावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते, तर दुसऱ्या नोटमध्ये महाराजांनी आपली पूर्ण संपत्ती आणि बँक खात्यांचा मालकी हक्क सेवेकरी विनायकला दिला आहे.

दुसरीकडे, महाराजांनी सुसाइड नोटमध्ये ज्या विनायक यांना आपला उत्तराधिकारी बनवले आहे, तेही ट्रस्टी आहेत. विनायक १९९६ मध्ये आश्रमात भय्यू महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते आश्रमाचे नियमित सेवेकरी बनले. महाराजांच्या आईची काळजी तेच घेत होते. दरम्यान महाराजांना मुलीशी भेटू न देण्याचा कट रचला जात होता. याच कारणामुळे महाराज सोमवारी मुलीला भेटण्यासाठी पुण्याला रवाना झाले होते, परंतु अर्ध्या वाटेतूनच परतले. तर महाराजांची एकच सुसाइड नोट होती, दुसरी कुणीतरी बनावट बनवली असल्याचे समोर येत आहे.