भयंकर…नूपुर शर्मा चे समर्थन केले म्हणून शिरच्छेद

58

उदयपूर, दि.२८ (पीसीबी): राजस्थानच्या उदयपूरच्या मालदास स्ट्रीट परिसरातून एक हादरवणारी घटना पुढे आली. आज भरदिवसा एका व्यक्तीचा दोन मुस्लिमांनी शिरच्छेद केला. मारेकऱ्यांनी हत्येचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मारेकरी हत्या केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकावताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राजस्थानमध्ये उमटले असून अनेक शहरांत तणावपूर्ण शांतता आहे.

शहरातील भूतमहालजवळील धानमंडी परिसरात टेलरिंग दुकानात हे मारेकरी जाताना दिसत आहेत. त्यापैकी एकाच्या हातात मोबाईल आहे जो सर्व घटना शूट करत आहे. तर दुसरा व्यक्ती माप देण्याच्या बहाण्याने त्या टेलर जवळ जातो आणि त्याच्यावर तलवारीने वार करतो. मारेकरी व्हिडिओमध्ये अपमानास्पद भाष्य करताना आणि मोदींना धमकावताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हत्येनंतर शहरातील वाढता तणाव लक्षात घेता उदयपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
मारेकरी, मोहम्मद रियाझ अख्तर आणि मोहम्मद गोश यांनी नंतर हत्येची कबुली दिली आहे. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला सोशल मीडियावर संबंधित टेलर व्यक्तीने पाठिंबा दिला होता. त्याचाच राग या पद्धतीने काढला गेला, असा अंदाज पोलीस वर्तवत आहेत.