भक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारावे – किशोर हातागळे

1608

पिंपरी दि.१८ (पीसीबी) – निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारावे, अशी मागणी निगडी भाजप अध्यक्ष किशोर हातागळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

किशोर हातागळे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक हे शहरातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. याठिकाणी शहरातील नागरिक येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात. समूहशिल्प परिसरात असणाऱ्या देशातील सर्वात उंच भारताच्या झेंड्यामुळे हे ठिकाणी म्हणजे शहराचे गौरव बनले आहे. याठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, याच चौकात सुरू असलेल्या भव्यदिव्य उड्डाणपुलामुळे व नियोजित मेट्रोमुळे या ठिकाणाला भविष्यात “राष्ट्रीय पर्यटन” स्थळाचा दर्जा प्राप्त होणार आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन या ठिकाणाला सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ बनविण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ऐतिहासिक माहिती शिल्पातून मिळावी यासाठी भक्ती-शक्ती समूहशिल्प येथे शिवसृष्टी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे साहित्यसृष्टी उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”