भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीवर कुर्‍हाडीने वार; एकास अटक

164

चिंचवड, दि. 29 (पीसीबी) : भंगार गोळा करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला शिवीगाळ करत कुर्‍हाडीने त्याच्यावर वार केले. यामध्ये भंगार गोळा करण्यासाठी आलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 28) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गावडे भोईर आळी, विठ्ठल मंदिराजवळ, चिंचवडगाव येथे घडली.

कैलास नवनाथ आरसूळ (वय 40, रा. वेताळनगर, चिंचवड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय सखाराम रावडे (वय 45, रा. चिंचवडगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी चिंचवडगाव येथील विठ्ठल मंदिराजवळ भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने ‘तू येथे रोडच्या चाललेल्या कामाचा साहेब आहेस काय, तू येथे काम करतो’, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच आरोपीने कुर्‍हाडीने फिर्यादी यांच्यावर वार केले. यामध्ये फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.