ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजय दत्तवर वेब सीरिज

95

मुंबई, दि.१ (पीसीबी) – अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या बायोपिकवरून जरी बरेच वाद निर्माण झाले असले तरी बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता संजूबाबाच्या आयुष्यावर आधारित वेब सीरिज येणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील जे पैलू चित्रपटाच्या माध्यमातून उलगडू शकले नाही, ते सर्व वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

यासंदर्भात एका आंतरराष्ट्रीय डिजीटल प्लॅटफॉर्मने संजय दत्त प्रॉडक्शनशी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना संजूबाबाच्या आयुष्यावर तीन भागांमध्ये वेब सीरिजची निर्मिती करायची आहे. ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या. परंतु, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्यात नाही दाखवल्या गेल्या. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर त्या सर्व गोष्टी आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय दत्तची प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा त्याची फक्त चांगली बाजू दाखवण्यासाठीच ‘संजू’ची निर्मिती केल्याची टीका अनेकांनी केली होती. आता वेब सीरिजवरून काही नवीन वाद सुरू होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.