ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या वंशज आहेत. कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण मोरोक्को येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत तसा दावा करण्यात आला आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या पैगंबरांच्या वंशज आहेत की नाही, याचा शोध घेण्यासाठी इतिहास संशोधकांनी ब्रिटनच्या या शाही फॅमिलीच्या वंशावळ्या धुंडाळल्या आहेत. इतिहासकारांनी महाराणीच्या ४३ पिढ्यांपर्यंतचा शोध घेऊन त्या पैगंबराच्या ४३व्या वंशज असल्याचा निष्कर्ष काढल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे. ‘बर्क्स पीरगे’चे संचालक हॅरल्ड बी क्रुस यांनीही १९८६ मध्ये तसा दावा केला होता. मात्र, आता मोरोक्कोच्या एका वृत्तपत्राने मार्च महिन्यातील अंकात हाच दावा करून पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे.

महाराणी द्वितीय यांचे रक्ताचे नाते थेट १४व्या शतकातील अर्ल ऑफ केंब्रिजशी आहे. त्याचा थेट संबंध मुस्लिम स्पेनपासून ते पैगंबरांची मुलगी फातिमापर्यंत पोहोचत असल्याचा इतिहासकारांचा दावा आहे. फातिमा ही हजरत मोहम्मद यांची मुलगी होती. तिचे वंशज स्पेनचे राजे होते. त्यांच्याशीच ब्रिटनच्या महाराणींचा संबंध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांना मोहम्मदांचे वशंज असल्याचे संबोधले जाते.