ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करा : पृथ्वीराज चव्हाण

23

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे हे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, असं चव्हाण यांनी केंद्र सरकारला सुचविले आहे. ते म्हणाले की, “प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जनतेचं आरोग्य आहे, त्याच्याशी तडजोड नको.”

बिहार निवडणुकीच्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्षात नेतृत्व आणि व्यापक संघटनात्मक बदल व्हावा यासाठी कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर काही नेत्यांसोबत सोनिया गांधी यांनी चर्चाही केली. या बैठकीविषयी विचारलं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “पत्राद्वारे आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. अत्यंत गांभीर्याने सोनियाजी यांनी या बैठकीत सर्वांचं म्हणणं ऐकलं.
काँग्रेसअंतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. ते म्हणाले की, “राहुल गांधी यांच्या पुनरागमनाबाबत मी काही बोलणार नाही. कोणीही लोकमान्य व्यक्ती असो ती पूर्णवेळ काम करणारी असली पाहिजे. निवडणुकीतून ती व्यक्ती नेमली तर अधिक चांगलं.”

ते पुढे म्हणाले की, “गेल्या वीस एक वर्षांत कार्यकारिणीच्या निवडणुका थांबल्या आहेत. काँग्रेसमधलं पार्लमेंटरी बोर्ड अस्तित्वात नाही. पक्षाच्या घटनेत जी तरतूद आहे ती पुन्हा चालू केली पाहिजे. त्यातून दुय्यम प्रकारचे नेतृत्त्व पुढे येणं थांबेल.”
“भाजपमध्ये हुकूमशाहीची प्रवृत्ती अंगभूत आहे. त्यांच्या कार्यशैलीत काँग्रेसने देशाला लोकशाही दिली आहे. अंतर्गत लोकशाही आणखी पुढे गेली पाहिजे यासाठी पक्षांतर्गत निवडणुकीचा आग्रह आहे. पक्षाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची लवकरच घोषणा होईल असं आम्हाला सांगितलं आहे.”

WhatsAppShare