ब्राम्हण, क्षत्रिय, मुस्लीम आणि शुद्र हे सगळेच आधी बौद्ध होते

141

नाशिक, दि. १२ (पीसीबी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आपल्या भाषणाच्या शैलीमुळे चर्चेत असतात. त्यांनी प्रत्येक विषयावर रचलेल्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी सगळेच बौद्ध होते असा दावा केला आहे.

सध्या देशात असलेले ब्राम्हण, क्षत्रिय, मुस्लीम आणि शुद्र हे सगळेच आधी बौद्ध होते असा दावा त्यांनी केला आहे. सर्वांत आधी जगात बौद्ध धर्म होता त्यानंतर हिंदू आला, त्यानंतर मुस्लीम असं करत सर्व धर्म तयार झाले. बौद्ध हा सर्वांत जुना धर्म आहे. मुस्लीम धर्म हा सुद्धा हिंदू धर्मापासून तयार झाला आहे असा दावा त्यांनी केला आहे.

सध्या राज्यात भोंग्याच्या प्रश्नावरून वाद पेटला असून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. देशात नरेंद्र मोदी हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी भूमिका मांडत असताना काही लोकं सध्या वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यावरून घेतलेली भूमिका योग्य नाही असं ते म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी अंगावर शाल पांघरली आहे, तर ती चांगली गोष्ट आहे कारण भगवा रंग हा शांततेचं प्रतीक असून गौतम बुद्धाच्या काळातही बौद्ध भिक्खूंच्या वस्त्रांचा रंगसुद्धा भगवाच होता म्हणून भगवा रंग हा वाद लावण्याचे प्रतीक नाही असं ते म्हणाले आहेत.