बोगस पदवीधारकांच्या पदव्या जप्त करा – डॉ. अभिषेक हरिदास

335

पिंपरी, दि.६ (पीसीबी) – केअर ऑफ पब्लिक सेफ्टी (COPS) संस्थेने बोगस विद्यापीठांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू केली असून त्याला समाजाच्या विविध स्तरांमधून वाढता पाठिंबा मिळत आहे. असे असले तरीही शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती अशा बोगस विद्यापीठांकडून मिळालेल्या पदव्या अभिमानाने मिरवीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पिंपळे निलख येथील निता ट्रेनिंग अँड कन्सल्टींग या संस्थेकडून पदवी मिळवलेल्या नागरीकांमध्ये शहरातील सुमारे ७० लोकांचा समावेश असून हे नागरीक पदवी देणाऱ्या संस्थेइतकेच दोषी आहेत, असा दावा केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचे डॉ. अभिषेक हरिदास यांनी बुधवार दि.५ रोजी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यूजीसीकडे या विद्यापीठाची नोंदणी नसल्याने संस्था बोगस ठरते. तसेच त्यांनी दिलेल्या पदव्यादेखील बोगस आहेत. या संस्थेवर कारवाईची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. परंतु या संस्थेच्या पदव्या मिरवणाऱ्या आणि त्या पदव्यांच्या आधारे व्यवसाय करणाऱ्यांवरदेखील कारवाई झाली पाहिजे. त्यांच्याकडील या बोगस पदव्या तातडीने जप्त केल्या पाहिजेत अन्यथा या व्यक्ती समाजाचे अपरिमित नुकसान करू शकतात, असेही डॉ. हरिदास यांनी सांगितले. निता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड कन्सल्टींग सर्व्हिसेस या संस्थे विरोधात वाकड पोलिस ठाणे येथे एफआयआर नं. ००८३ कलम ४२० अंतर्गत दि. १ फेब्रुवारी २०२० रोजी ‘सीओपीएस’ संस्थेने एफआयआर दाखल केला आहे.या संस्थेकडून पदव्या घेतलेल्या नागरीकांकडून संस्थेने या पदव्यांसाठी मोठी रक्कम फी म्हणून घेतली आहे, तसेच मोठी फी घेऊनही नागरीकांना बोगस पदव्या दिल्या आहेत. त्यामुळे अशा नागरीकांनी निता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड कन्सल्टींग सर्व्हिसेस यासारख्या बोगस संस्थांना धडा शिकवण्यासाठी  पुढे यावे आणि संस्थेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करावी. या कामी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी (COPS) संस्था त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यास तयार आहे, असेही डॉ. हरिदास यांनी सांगितले.

अशा पद्धतीच्या महाराष्ट्रात सुमारे एक हजार बोगस विद्यापीठांचा सुळसुळाट झाला असून हजारो तरुणांना बोगस पदव्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी डॉ. हरीदास यांनी केली आहे. तसेच यापूर्वीच आपण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखलीयाल, लातूरचे माजी खासदार सुनील बळीराम गायकवाड, शिवसेनेचे आमदार राजन साळवी, सध्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु श्री श्री रवि शंकर आणि भगवान श्री बाळासाई बाबा यांनी मिळविलेल्या पदव्या आणि त्यांना पदवी देणारे विद्यापीठ यूजीसीकडे नोंदणी झालेले नाही. यातील काही सन्माननीय व्यक्तींनी श्रीलंकेसारख्या परदेशातील विद्यापीठांच्या डॉक्टरेट पदव्या घेतल्या आहेत. परंतू, श्रीलंकेच्या सरकारने देखील अशी विद्यापीठे आमच्याकडे नोंद नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

निता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड कन्सल्टींग सर्व्हिसेस या संस्थेबाबत कॉप संस्थेने २८/०१/२०२० रोजी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय शिवाजीनगर पुणे यांच्याकडे मेलव्दारे माहिती मागितली असता. त्यांनी दि. ०३/०२/२०२० रोजी वरील संस्थेच्या चौकशीबाबत नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे चे प्रभारी सहसंचालक डॉ. दि.रा. नंदनवार यांनी दिला आहे. (तो सोबतच्या मेलवर आपणास पाठविला आहे).

या संदर्भात डॉ. अभिषेक हरिदास यांनी वाकड पोलिस ठाण्यात १ फेब्रुवारी रोजी तक्रार (FIR NO. ००८३) दाखल केली. या संदर्भात दि. २८ जानेवारी २०२० रोजी तंत्रशिक्षण विभागाकडेही तक्रार दाखल करून सदर संस्थेच्या चौकशीची मागणीही डॉ. हरिदास यांनी केली होती. त्याचा चौकशी अहवाल तंत्रशिक्षण विभागाचे प्रभारी सहसंचालक डॉ. दि.रा.नंदनवार यांनी ३ फेब्रुवारी रोजी दिला आहे. डॉ. एम. एस. रणदिवे आणि डॉ. चंद्रशेखर सेवतकर यांच्या समितीने प्रत्यक्ष पाहणीनंतर हा अहवाल दिला आहे. निता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड कन्सल्टींग सर्व्हिसेस ही संस्था अनधिकृत संस्था स्थापन करणे व अनधिकृत पाठ्यक्रम सुरू करणे प्रतिबंध अधिनियम २०१३ मधील तरतुदींनुसार अपात्र आहे, अशी समितीची स्पष्ट धारणा आहे, सदर संस्था इंटरनॅशनल अॅक्रिडिटेशन ऑर्गनायझेशन (आयएओ) तर्फे मानांकित करण्यात आली आहे, असे संस्थाचालकांनी नमूद केले असून त्याबाबतची प्रत सोबत जोडली आहे. परंतु सदर संस्थेने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), तंत्रशिक्षण संचालनालय  किंवा महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ यापैकी कुणाचीही परवानगी घेतलेली नाही. सदर संस्था महाराष्ट्र दुकाने अधिनियम या अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडे नोंदणीकृत आहे. तसेच सदर संस्था विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, नवी दिल्ली अंतर्गत नोंदणीकृत आहे. परंतु सदर विद्यापीठाचे नाव युजीसीने प्रकाशित केलेल्या खोट्या विद्यापीठांच्या यादीमध्ये असल्याचे निदर्शनास येते, असे या अहवालात म्हटले आहे.

निता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड कन्सल्टींग सर्व्हिसेस ही संस्था एन २४३, नानगुडे कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. २, पहिला मजला, साई कॉर्नर, जगताप डेअरी चौक, होम डेकोरच्या मागे, पिंपळे निलख, पुणे – ४११०२७ या ठिकाणी आहे. ही संस्था निता कॉलेज ऑफ एज्युकेशन, टीचर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, जॉब अँड बिझनेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या नावाने विविध उपक्रम राबविते. त्या अंतर्गत बॅचलर ऑफ एज्युकेशन, मास्टर ऑफ एज्युकेशन, डिप्लोमा इन एज्युकेशन, टीचर्स ट्रेनिंग कोर्स, माँटेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स, नर्सरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स, पर्सनालिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (पीजीडीबीएम) अशा नावाने विविध कोर्स विद्यार्थ्यांना शिकविण्यात येतात.

अशा बोगस शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमुळे नव्या पिढ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होत आहे. १३० कोटींपैकी ६५ टक्के तरुणाई असलेल्या आपल्या देशात तरुणांचे भवितव्य उध्वस्त करणाऱ्या अशा संस्थांवर आणि या संस्थांच्या पदव्या मिरवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचे अध्यक्ष आदम बेग यांनी यावेळी उपस्थित केला.      

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदम बेग, प्रदीप माने, राहुल विटकर, धनराज चौधरी आदी उपस्थित होते.

 

WhatsAppShare