बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचे कारस्थान; राज्य सरकारने हस्तक्षेप करावा – उद्धव ठाकरे

119

मुंबई, दि. २ (पीसीबी) – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी बेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देणं हे कारस्थान आहे, राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून कर्नाटकच्या या प्रस्तावाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आक्षेप नोंदवला पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

या मुद्द्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना कानडी सरकारचा हे डावपेच सीमाबांधवांच्या जेवढे जिव्हारी लागले आहेत तेवढेच ते महाराष्ट्राच्या आणि मराठी मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागणार आहेत काय? असा सवाल उपस्थित केला आहे. या हालचालींविरुद्ध सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये आणि महाराष्ट्रातही प्रचंड रोष आहे. महाराष्ट्र सरकार याकडे कसे बघते आणि काय करते आहे याकडे आमचे लक्ष आहे, अशा शब्दात शिवसेनेने राज्य सरकारला इशाराही दिला आहे.