बेमुदत उपोषण: हार्दिक पटेलांनी तयार केले मृत्यूपत्र

2246

अहमदाबाद, दि. ३ (पीसीबी) – गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या बेमुदत उपोषणाच्या नवव्या दिवशी आपले मृत्यूपत्र तयार केले आहे. यात त्यांनी त्यांची संपत्ती त्यांचे आई-वडील आणि एका गोशाळेत विभागली आहे. पाटीदार समाजाला आरक्षण, शेतकरी कर्जमाफा आणि आपला सहकारी अल्पेश कठीरिया यांच्या सुटकेच्या मागणीसाठी हार्दिक उपोषणाला बसले आहेत.

हार्दिक यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहीले की, ‘या निर्दयी भाजप सरकारविरोधात मी २५ ऑगस्टपासून उपोषण करत आहे. माझे शरीर कमजोर झाले आहे आणि मला आजार, संसर्ग झाला आहे. तब्येत ढासळत चाललेली असताना मला आता शरीरावर भरवसा राहिलेला नाही. म्हणून मी माझी अंतिम इच्छा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.’ त्यांनी आपले डोळे दान करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

पाटीदार समाजाचे एक अन्य नेता मनोज पनारा यांनी हार्दिकच्या मृत्यूपत्राची घोषणा केली. जर हार्दिक यांनी काही झालं तर त्यांच्या बँक खात्यातल्या ५० हजार रुपयांपैकी त्यांच्या आई-वडीलांना २० हजार रुपये आणि अहमदाबादच्या विरामगाम तालुक्यातील हार्दिक यांच्या चंदननगर या गावाजवळील गोशाळेला ३० हजार रुपये देण्यात यावेत, अशी हार्दिक यांची इच्छा आहे. हार्दिक यांचे पुस्तक ‘हु टूक माय जॉब’ ची ३० टक्के रॉयल्टी त्यांचे आई-वडील, बहीण यांच्यात वाटली जावी तर ७० टक्के भाग पाटीदार आरक्षण आंदोलनात मारल्या गेलेल्या १४ युवकांच्या नातेवाईकांना दिला जावा, अशीही त्यांची अखेरची इच्छा आहे. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही.