बेताल वक्तव्याप्रकरणी ८ दिवसात उत्तर द्या; राम कदम यांना महिला आयोगाचे नोटीस

195

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत बेताल वक्तव्य केले. याची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करून आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत. महिलांबाबत वक्तव्य करताना आमदार राम कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती असे मत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याआधीच व्यक्त केले आहे. आता स्युमोटो दाखल केल्यानंतर राम कदम यांनी या प्रकरणात ८ दिवसात उत्तर द्यावे असेही आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.

भाजपा आमदार राम कदम यांचा दहीहंडीच्या दिवशी बोलताना ताबा सुटला. उपस्थित तरूणाईशी संवाद साधत असतान ते म्हटले होते की एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज केले आणि तिने तुम्हाला नकार दिला. तर त्या मुलाने आपल्या आई वडिलांना आणावे, आई वडिलांनी जर सांगितले की आम्हाला मुलगी पसंत आहे तर मुलीला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. १०० टक्के मी मदत करेन हा शब्द देतो असेही राम कदम यांनी म्हटले होते.

राम कदम यांनी केलेल्या या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजातल्या सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. एवढेच नाही तर शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. आता राज्य महिला आयोगाने त्यांना आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.