बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड निश्चित

0
413

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय)  अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे.  मुंबईत रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते.  

अध्यक्षपदाच्या नावासाठी बीसीसीआयचे  माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर व एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी आपापल्या नावांची शिफारस केली होती.  या दोन्ही नावावर चर्चा  करण्यात आली. अखेर गांगुलीच्या नावावर सर्व सहमतीने शिक्कामोर्तब करण्यात आला.

कर्नाटकटचे ब्रिजेश पटेल यांच्यावर आयपीएलचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा  बीसीसीआयचे सचिव म्हणून तर, अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर हे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतील.  आसाम क्रिकेट असोसिएशनचे देवजीत सैकिया यांचे नाव सहसचिव पदासाठी चर्चेत आहे.

दरम्यान, सौरव गांगुली आज (सोमवार)  अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २३ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेली बीसीसीआयची नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होण्याची  शक्यता  आहे.