बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या मालमत्तेवर टाच

354

बीड, दि. १३ (पीसीबी) –  बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह इतर ८ जणांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत.  परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या ३ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी मुंडे यांच्यासह इतर ८ जणांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाहीत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली आहे. ३ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी धनंजय मुंडे यांचे घर, सूतगिरणीचे कार्यालय आणि विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेचे यापुढे व्यवहार करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे   त्यातून लाभ घेता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

या गैरव्यवहारप्रकरणी धनंजय मुंडे यांची देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपूर येथील  शेतजमिनीसह परळीच्या अंबाजोगाई रोडवरील घर, संत जगमित्र सूतगिरणीच्या कार्यालयाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी २ ऑक्टोबर २०१३ रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विशेष तपास पथकाने ३ वर्षांनंतर ११ जुलै २०१६ रोजी दोषारोप पत्र परळी न्यायालयात दाखल केले होते.