बीडमधून १ ऑक्टोबररोजी राष्ट्रवादी सरकारविरोधात रणशिंग फुंकणार

326

बीड, दि. १६ (पीसीबी) – बीड जिल्ह्यातून भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी रणशिंग फुंकणार आहे. १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,  अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी  धनंजय मुंडे म्हणाले की,  लोकसभा, विधानसभा निवडणुका डिसेंबर किंवा फेब्रुवारीत होण्याचा अंदाज बांधून राष्ट्रवादी पक्ष तयारीला लागला आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष  आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. इंधन दरवाढ सारखी होत आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. प्रत्येक घटकातील नागरिक बेजार आहे. यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. यासाठी विजयी संकल्प मेळावे आयोजित केले आहेत.

या संकल्प मेळाव्यांची बीडमधून सुरुवात करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर रोजी शरद पवार बीड मुक्कामी येणार आहेत. १ ऑक्टोबर रोजी बीडमध्ये मेळावा होईल. यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.