“बिहारींना रोजी-रोटीच नव्हे तर शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं?”: कन्हैय्या कुमार

184

पटणा, दि.२४ (पीसीबी) : काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले फायर ब्रँड नेते कन्हैय्या कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जोरदार घेरलं आहे. बिहारची अवस्था अत्यंत वाईट आहे. बिहारींना रोजी-रोटीच नव्हे तर शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं? असा सवाल कन्हैय्या कुमार यांनी केला आहे.

बिहारच्या कुशेश्वरस्थान आणि तारापूरमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही जागांवर येत्या 30 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यानिमित्ताने तारापूर येथे कन्हैय्या कुमार प्रचारासाठी आले होते. आज बिहारमध्ये रोजीरोटी, शिक्षण, रोजगार, उपचार एवढेच नव्हे तर हनिमूनसाठीही इतर राज्यात जावं लागत आहे. विस्थापित होणं हा एक मोठा सवाल आहे. बिहारमध्ये विकास अडकला आहे, असं कन्हैय्या कुमार यांनी सांगितलं.

या दोन्ही पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि आरजेडी स्वबळावर लढत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे हे त्यांनी विसरू नये. आम्ही एका मोठ्या पक्षाचा हिस्सा आहोत. त्यामुळे मोठ्या पक्षाचं थोडं ऐकलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊ नये. जनतेची साथ आवश्यक असते. जनतेची साथ असेल तर इतर लोकही सोबत येतील, असं ते म्हणाले.

दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी कन्हैय्या कुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांनी सातत्यानं मोदी सरकार आणि हिटलरशाही विरोधात संघर्ष केला आहे. आमच्या या साथीदारांना वाटलं ही हा आवाज अजून बुलंद व्हावा. त्यामुळे त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा आवाज आता काँग्रेस आणि राहुल गांधींच्या आवाजात मिळून ‘एक और एक ग्यारह’ होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी व्यक्त केली होती.

अनेक राज्यांत केंद्रीय तसेच राज्य पातळीवर काँग्रेस खिळखिळी झाली आहे. बिहारसारख्या राज्यात काँग्रेसचे फक्त 19 आमदार आहेत. येथे आरजेडीसारख्या इतर प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्ष मजूबत करण्याकडे लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कन्हैयासारख्या तरुण नेत्याला पक्षात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कन्हैया कुमार तरुण आणि तडफदार आहेत. तसेच तरुण, विद्यार्थ्यांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणं, मांडलेले मुद्दे चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे कन्हैया यांचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो, असा अदांज काँग्रेसमधील नेते बांधत आहेत. दरम्यान, कन्हैया कुमारने कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी त्यांना पराभूरत केलं होतं.