बिल्डरविरोधात तक्रार करणे झाले सोपे; घरबसल्या महारेराच्या वेबसाईटवरून करा तक्रार

90

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – रखडपट्टी करणाऱ्या बिल्डरविरोधात महारेराकडे तक्रार करण्याचा मार्ग आता अधिक सुलभ झाल आहे. पाच हजार रूपये भरून तक्रारी करायची, त्यानंतर फक्त सुनावणीसाठी जायचे किंवा स्वत:हून कागदपत्रे पोहोचवण्याची कटकट उरलेली नसून, ग्राहकांना आता घरबसल्या महारेराच्या वेबसाईटवर तक्रार करता येणार आहे.

ग्राहकाने एखाद्या बिल्डरच्या गृहनिर्माण प्रकल्पात गुंतवणूक केली असेल आणि सदनिकेचा ताबा मिळण्यात विलंब होत असेल किंवा अन्य काही तक्रार असल्यास महारेरा कायद्यानुसार पाच हजार रूपये भरून तक्रार करता येते. त्यानंतर कागदपत्रांचा संच रेरा कार्यालयात नेऊन द्यावी लागत असे.

आणखी एक संच व नोटीस संबंधित बिल्डरलाही द्यावी लागे. मग रेरा कार्यालयाकडून सुनावणीसाठी तारीख दिली जात असे. कागदपत्रे पुरवण्यात जवळपास १५ दिवस खर्ची जात. तक्रार दाखल केल्यानंतर ६० दिवसांत सुनावणी होती. एका अर्थाने तक्रारदारालाच धावपळ करावी लागत असे. आता ही प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. अशीच सुविधा रेराकडे नोंदणी न केलेल्या प्रकल्पाच्या तक्रारीसाठीही असेल. एखाद्या बिल्डरने प्रकल्प रेराकडे नोंद केला नसेल आणि त्याबाबत कोणाला तक्रार करायची असेल तर पाच हजार रुपये भरून माहिती वेबसाइटवर अपलोड करायची, तक्रारीत फक्त आपला मोबाइल क्रमांक नोंदवायचा. पुढे रेराकडून बिल्डरला नोटीस जाईल व तशी माहिती तक्रारदारला मोबाइलवर मिळेल. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.