बिर्ला रुग्णालयावर आणखी एक गुन्हा; दहा महिन्यांचे बाळ दगावले, स्वाभिमानी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की

1259

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – शासकीय योजनेचा लाभ न मिळावा म्हणून  वैद्यकीय  खर्चाचे कोटेशन देण्यास विलंब लावल्याने एका गरीब कुटूंबातील दहा महिन्यांच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या गलथानपणाचा जाब विचारण्यास गेलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या काही कार्यकर्त्याना माहिती देण्यास टाळाटाळ करुन दमदाटी करत चिंचवड येथील अदित्य बिर्ला रुग्णालयातील बाऊन्सरने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत मधुकर गायकवाड (वय २९, रा. ठाणे, मुंबई) यांनी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार आदित्य बिर्ला रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी  शिल्पी व जनसंपर्क अधिकारी पवार या दोघांसह एका बाऊन्सरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय योजनेचा लाभ न मिळावा म्हणून वैद्यकीय खर्चाचे कोटेशन देण्यास विलंब लावल्याने १५ ऑगस्ट रोजी समर्थ सागर राणे या दहा महिन्याच्या गरीब कुटूंबातील चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला होता. याचा जाब विचारण्यासाठी शनिवारी स्वाभिमानी संघटनेचे प्रशांत मधुकर गायकवाड आणि विक्रम गायकवाड हे दोघे गेले होते. मात्र त्या दोघांना तेथील प्रशासकीय अधिकारी शिल्पी व जनसंपर्क अधिकारी पवार यांनी दमदाटी केली तसेच एका बाऊन्सरने त्या दोघांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तिघा आरोपींविरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार तपास करत आहेत.

दरम्यान, गरीब आणि दारिद्रय रेषेखालील नागरिकांवर शासकीय योजने अंतर्गत आदित्य बिर्ला रुग्णालयाला उपचार करणे बंधनकारक आहे. मात्र, कोटा संपल्याचे सांगून त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. यामुळे नागरिक दगावतात तसेच उपचाराच्या नावाखाली अक्षरश: लुट केली जाते. यामुळे या रुग्णालयावर लवकरात लवकर कारवाई करुन गरीबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.