बिबवेवाडीत एटीएमवरील दरोड्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला, तिघांना अटक

175

पुणे, दि. १० (पीसीबी) – बिबवेवाडी पद्मा सहकारी सोसायटी शेजारील स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील तिघा जणांना पोलिसांनी जाग्यावरच अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन तरुणाचाही समावेश असून दोनजण फरार झाले आहेत. ही घटना आज (सोमवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

बिबवेवाडी पोलिसांनी रोहित चंद्रकांत जानराव (वय १९, रा. बिबवेवाडी),  अविनाश अर्जुन जोगन (वय २२) आणि एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. तर त्यांचे इतर दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बिबवेवाडी पोलिस आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबवेवाडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी पद्मा सहकारी सोसायटी शेजारील स्टेट बँकेच्या एटीएमवर त्यांना पाच जण संशयीतरित्या आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेऊन रोहित, अविनाश आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला अटक केली. तर इतर दोघेजण पोलिसांना पाहताच फरार झाले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता ते स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आले होते, असे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयता आणि दुचाकी असा एकूण २५  हजारांचा ऐवज जप्त केला. बिबवेवाडी पोलिस इतर दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत.