बावधनमध्ये राहणाऱ्या एका इसमाला व त्याच्या मित्राला २५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगून ओळखीच्याच तीघा जणांनी त्यांच्या कडून अडीच लाख रुपये जबरदस्तीने घेतले. तसेच त्यांना जबर मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना ९ मार्च रात्री साडेआठ ते १० मार्च दुपारी दोनच्या सुमारास बावधन ते खेड शिवापूर रोड दरम्यान घडली.

कृष्णा भुजंगराव वारे (वय ३८, रा. आनंदनगर, पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी फिर्यादी यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. त्यांनी २०१७ ला औरंगाबादमध्ये डिजीटल मार्केटींग नावाचे कार्यक्रम घेऊन लोकांना ट्रेनिंग दिले होते. यामध्ये त्यांना साडेचार लाख रुपयांचा नफा मिळाला होता. तरी सुध्दा आरोपी कृष्णा हा त्यांच्या हाताखालील लोकांना पैसे देत नव्हता यामुळे आरोपी आणि फिर्यादी यांच्या मध्ये भांडणेही झाली होती. यावेळी फिर्यादी यांच्या मित्र देखील मद्यस्ती झाला होता. याचा राग मनात धरुन आरोपी कृष्णा व त्याच्या दोन शाथीदारांनी ९ मार्चला फिर्यादी आणि त्यांच्या मित्राचे अपहरण केले. त्यांना गाडीतच जबरमारहाण केली.तसेच तुमच्यामुळे माझे २५ लाखांचे नुकसान झाले आहे असे सांगून फिर्यादी यांची गाडी ताब्यात घेतली. तसेच त्यांच्याकडून अडीच लाख रुपये घेऊन फरार झाला. आरोपी कृष्णा भुजंगराव वारे याला हिंजवडी पोलीसांनी तातडीने अटक केली मात्र त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.