बाळ रडल्याने भारतीय कुटुंबाला विमानातून उतरवले

1172

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – तीन वर्षांचे बाळ रडले म्हणून युरोपातील प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनीने एका भारतीय कुटुंबाला विमानातून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळ रडू लागल्याने त्याची आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावर विमानातील एका कर्मचाऱ्याने आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्यांना विमानातून उतरवले, असा आरोप या कुटुंबीयानं केला.

ब्रिटिश एअरवेजच्या लंडन-बर्लिन (बीए ८४९५)या विमानाच्या उड्डाणावेळी हा कथित प्रकार घडला. या बाळाचे वडील रस्ते वाहतूक मंत्रालयात सहसचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी याप्रकरणी नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘सुरक्षेसंबंधी उद्घोषणेनंतर आम्ही सीटबेल्ट बांधत होतो. माझ्या पत्नीने मुलाला सीट बेल्ट बांधले त्यावेळी ते रडू लागले. माझी पत्नी त्याला शांत करत होती. त्यावेळी तेथे विमानातील कर्मचारी आले आणि पत्नी आणि मुलावर जोरजोरात ओरडू लागले. त्यामुळे मूल आणखी घाबरले,’ असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. विमानाच्या उड्डाणावेळी मुलाला खिडकीतून बाहेर फेकून देण्याची धमकी कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच आमच्या वर्णावरून आक्षेपार्ह टिप्पणी केली. आमच्या आसनाच्या मागे बसलेल्या एका भारतीय कुटुंबानंही मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला; तर त्यांनाही विमानातून उतरवण्यात आले, असा आरोपही त्यांनी तक्रारीत केला.