बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा मोठा अपेक्षाभंग होणार- राहुल कुल

203

पुणे, दि. १७ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा अपेक्षाभंग होणार असून, येथील जनतेने भाजपला प्रचारादरम्यान प्रचंड प्रतिसाद दिला. येथील जनता राष्ट्रवादीच्या नेत्यांची ‘गंमत’ करणार असून कमळाचा विजय निश्चित आहे, असा विश्वास दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.

राहुल यांच्या पत्नी कांचन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी लढत दिली. ही लढत देशात गाजली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राहुल कुल म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे नेते अजित पवार यांनी ईव्हीएमवर शंका घेणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. आता राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी ईव्हिएमबद्दल का शंका व्यक्त केली, यांची मला कल्पना नाही. या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतो, याची जाणीव झाल्यामुळेच तशी शंका व्यक्त होत असावी.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचे गणित हे केवळ बारामती विधानसभा मतदारसंघात मिळणाऱ्या लिडवर अवलंबून आहे. मात्र बारामती तालुक्यातच राष्ट्रवादीचा अपेक्षाभंग होणार आहे. इतर पाचही विधानसभा मतदारसंघात आम्ही ताकदीने उतरलो होतो. त्यामुळे तेथेही भाजपलाच मताधिक्य मिळणार आहे. माझ्या दौंड तालुक्यात तर आम्ही चांगले मताधिक्य घेऊ. येथील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते हे दौंडमध्ये राष्ट्रवादीलाच लीड मिळणार असल्याची भाषा करतात. पण मतमोजणीच्या दिवशी भाजपलाच दौंडमधून राष्ट्रवादीपेक्षा अधिक मते मिळतील, याबाबत खात्री आहे, असे कुल यांनी सांगितले.