बारामतीत तरुणीचे अपहरण करुन बलात्कार

238

बारामती, दि. २८ (पीसीबी) – तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. तसेच आरोपीने तरुणीला धमकी देत पोलिसांपासून वाचण्यासाठी तिच्याशी लग्न देखील केले. ही घटना बारामती येथे घडली.

याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने बारामती शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी  प्रशांत अशोक जगताप (रा. श्रीरामनगर, बारामती) आणि त्याचा भाऊ बंटी या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवार १२ जूनला रात्री नऊच्या सुमारास आरोपी प्रशांत याने पिडीत २० वर्षीय तरुणीचे कारमधून अपहरण केले. गाडी लॉक करुन गप्प बस, नाही तर तुझा जीव घेईन, अशी धमकी या आरोपीने तरुणीला दिली. त्यानंतर या तरुणीला अकलूजला नेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरोपीने या युवतीला इंदापूर येथील वकिलाकडे नेत स्टॅम्प पेपरवर सह्या करायला लावल्या.  तसेच पोलिसांनी विचारले तर आपले लग्न झाले असून आपण स्वखुशीने घराबाहेर असल्याचे सांग, असे न केल्यास दोघांचे फोटो व्हॉट्सअपला टाकून तुझी बदनामी करेन, अशी धमकी आरोपी प्रशांत या पीडितेला देत होता.

बारामती शहर पोलिसांनी पीडितेला १८ जूनला भोर येथून ताब्यात घेतले. मात्र घाबरलेल्या पीडितेने चुकीचा जबाब पोलिसांना दिला. कुटुंबियांनी विश्वासात घेत तिला हकीकत विचारली असता हा प्रकार उघडकीस आला.