ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बाहेरील देशातून तब्बल २००० हुन जास्त लोक मुंबईत दाखल; आता…

52

मुंबई, दि.०३ (पीसीबी) : कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. हे प्रकरण ताज असतानाच आता मुंबईकरांचं, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं आहे. कारण गेल्या काही दिवसात मुंबईत ओमिक्रॉनच्या धोकादायक अशा देशातून हजार पाचशे नाही तर 2668 जण दाखल झालेत. विशेष म्हणजे यांच्यापैकीच 9 जण आणि त्यांच्या संपर्कातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून, त्यांचा ओमिक्रॉनचा अहवाल प्रतिक्षेत आहे. त्यामुळेच मुंबईकरांनी आता घरात आणि घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे. आधीच अवकाळी पावसानं वातावरण डल केलेलं असताना, त्यात आणखी आरोग्याच्या समस्या उदभवणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे.

यूरोप, आफ्रिका, अमेरीका मिळून 40 देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव झालेला आहे. भारतानं हाय रिस्क (Omicron High Risk Countries) म्हणजेच धोकादायक देशांची यादी जाहीर केलीय. त्यात 11 देश आहेत. त्यात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बोत्सवाना, चीन, झिम्बाब्वे, मॉरीशस, हॉंगकॉंग, न्यूझीलंड, सिंगापूर यांचा समावेश आहे. म्हणजेच या देशातून जे कुणी प्रवासी भारतात येतील, त्यांच्यावर प्रशासनाची कडक नजर असेल. तसच त्यांना चाचणी, क्वारंटाईनचे सगळे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. टाईम टू टाईम ही धोकादायक देशांची यादी अपडेट होईल. पण 10 नोव्हेंबरपासून आतापर्यंत जिथं कोरोनानं हातपाय पसरलेत अशा 40 देशातून 2868 जण मुंबईत दाखल झालेत.

गेल्या 20-25 दिवसात हाय रिस्क देशातून जे लोक दाखल झालेत त्यांचा शोध घेतला जातोय. त्यापैकी 500 जणांचा शोध लागला असून त्यांच्या सर्व चाचण्या केल्या गेल्यात. त्यापैकीच 10 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. हे 10 जण मुंबई, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, भाईंदर, अशा मोठ्या शहरातले रुग्ण आहेत. जे 40 देशातून दाखल झालेत, त्यांची एक लिस्ट तयार करण्यात आलीय. जे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत, त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग केली जातेय. तसच ओमिक्रॉन आहे की नाही याची माहिती देणारी एस जिन चाचणीही केली जाणार आहे. याचा रिपोर्ट आज उद्या अपेक्षीत आहे. ह्या सर्व चाचण्यावरच पुढील सगळी दिशा स्पष्ट होणार आहे.

ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका कामाला लागली आहे. दहा जम्बो कोविड सेंटर्स सज्ज करण्यात येणार आहेत. सध्यस्थितीत 5 जम्बो कोविड सेंटर्स कार्यरत आहेत. 10 जम्बो कोविड सेंटर्समुळे 13 हजार 466 बेड जे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह सुसज्ज असतील. सध्याची उपलब्ध बेडसंख्या अशी आहे….

दहिसर, कांदरपाडा – 700
मालाड जम्बो- 2200
नेस्को गोरेगाव फेज 1 – 2221
नेस्को गोरेगाव फेज 2- 1500
बीकेसी कोविड सेंटर- 2328
कांजूरमार्ग कोविड- 2000
सायन जम्बो कोविड- 1500
आरसी भायखळा- 1000
आरसी मुलुंड जम्बो- 1708
मुंबईत सध्यस्थितीत तरी कोरोना नियंत्रणात आहे. दैनंदिन रुग्णसंख्या घटलेली आहे. ही संख्या शंभरपर्यंत खाली गेलीय. पण ओमिक्रॉनचं नवं संकट उभं राहिलंय. त्यापार्श्वभूमीवर प्रशासन आणि जनता दोघांनाही एकमेकांना सहकार्य केलं तरच ओमिक्रॉनचं संकट रोखता येण्यासारखं आहे.