बापरे! एकाच दिवशी चोरीच्या नऊ घटनांची नोंद; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

199

पिंपरी, दि.२० (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, निगडी, भोसरी, हिंजवडी, तळेगाव, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या नऊ गुन्ह्यांची एकाच दिवशी नोंद झाली आहे. या नऊ घटनांमध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, दागिने, सायलेन्सर, सायलेन्सरमधील पार्ट आणि दुचाकी वाहने असा एकूण चार लाख 54 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे.

चाकण पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या घटनेत गणेश खंडू केसवड यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे खराबवाडी येथे किराणा मालाचे दुकान आहे. दुकानातून एका चोरट्याने रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 45 हजार 990 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विशाल भानुदास शिरसाठ (रा. खराबवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुस-या घटनेत अजिंक्य अनिल जोशी (वय 33, रा. च-होली, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या शिंदेगाव येथील टायओ निपोन कंपनीतून आठ प्रकारच्या एक लाख 47 हजार 890 रुपयांच्या वायर चोरून नेल्या आहेत.

वैशाली विनायक क्षीरसागर (वय 67, रा. कात्रज आंबेगाव (बु) पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी मंगळवारी सकाळी साडेअकरा ते दीड वाजताच्या कालावधीत कात्रज ते निगडी या मार्गावर बसने आणि निगडी ते यमुनानगर या मार्गावर रिक्षाने प्रवास करत होत्या. त्यावेळी प्रवासात अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील 37 हजारांची सोन्याची बांगडी आणि हॅन्डबॅग मधील रोख रक्कम चोरून नेली.

भोसरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या गुन्ह्यात दत्तात्रय जिजाभाऊ तिकांडे (वय 33, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या इको गाडीचा 10 हजारांचा सायलेन्सर चोरट्यांनी चोरून नेला. दुस-या गुन्ह्यात भीमसिंग कल्याणसिंग राजपूत (वय 35, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या इको गाडीच्या सायलेन्सरमधील कॅटिलिटी कन्व्हर्टर नावाचा 20 हजारांचा पार्ट चोरट्यांनी चोरून नेला आहे. अक्षय नामदेव वाळके (वय 27, रा. देहूरोड किवळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची एक लाख रुपये किमतीची बुलेट दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पंचजन्य ऑटोमोबाईल टाटा मोटार शोरूमच्या बाहेर, भोसरी येथून चोरून नेली आहे.

अक्षय संजय कांबळे (वय 28, रा. सुसगाव, ता. मुळशी. वायुसेना नगर, नागपूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे यांनी त्यांची 25 हजार रुपये कीमतीची दुचाकी त्यांच्या खोलीसमोर पार्क केली होती. तिथून चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली.

श्रवणराम डगराराम सोलंकी (वय 32, रा. वतननगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 44 हजार रुपये कीमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बिल्डींगच्या पार्कींगमधून चोरुन नेली.

दुचाकी चोरीचा आणखी एक घटना पिंपळे सौदागर येथे घडली. अज्ञात चोरट्यांनी अशोक तुळशीराम इंगळे (वय 67, रा. चिखली) यांची 25 हजारांची दुचाकी चोरुन नेली. इंगळे यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.