बापटसाहेब तुम्ही साताऱ्यातून उभे रहावे,  मी माघार घेईन – खासदार उदयनराजे

1756

सातारा, दि. २ (पीसीबी) – बापटसाहेब, बस्स झाला महाराष्ट्र, तुम्ही आता दिल्लीत या. म्हणजे तुमचा सहवास जास्त लाभेल. बापटसाहेब तुमची इच्छा असेल, तर तुम्ही  साताऱ्यातून उभे रहावे, मी माघार घेईन, अशी ऑफर साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांना दिली.

इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या सातारा शाखेचे उद्‌घाटन गिरीश बापट  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी बापट यांना साताऱ्यातून खासदारकी लढवण्याची ऑफर दिल्याने  उपस्थित आवाक् झाले. त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत हे विधान केले.

बापट साहेबांच्या येण्यामुळे मन प्रफुल्लित होते. एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. मी त्यांना गाडीतून येताना सांगितले, बस्स झाला महाराष्ट्र, तुम्ही आता दिल्लीत या. म्हणजे तुमचा सहवास जास्त लाभेल. बापटसाहेबांची इच्छा असेल तर त्यांनी साताऱ्यातून उभे रहावे, मी माघार घेईन, अशी जाहीर ऑफरच उदयनराजेंनी गिरीश बापटांना दिली.

यावेळी गिरीश बापट म्हणाले की,  या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे आहेत, हे समजल्यामुळे मी पुण्याचा कार्यक्रम रद्द करून साताऱ्याच्या कार्यक्रमाला खास आलो. कारण व्यासपीठावर उदयनराजेंसोबत असणे, यासाठी भाग्य लागते. पूर्वी आम्ही अनेकदा एका व्यासपीठावर होतो. आज या निमित्ताने महाराज येथे आहेत. मला जुनी पोटनिवडणूक आणि खासदारकीची निवडणूक आठवते. उदयनराजे असले, की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांला उत्साह येतो. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो.