बहुचर्चित लवासा प्रकल्पाची अखेर बोली लागली….बँकांचे तब्बल ‘इतके’ कोटी गुंतून पडले…

0
3913

पुणे, दि. २० (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना बोली लावण्यास 20 नोव्हेंबर ही अखेरची मुदत असणार आहे. लवासा प्रकल्पासाठी बोली लावण्यास शुक्रवारपर्यंत किती गुंतवणुकदार पुढे येतात आणि त्यांच्याकडून अपेक्षित रकमेची बोली लावली जाते का यावर लवासा प्रकल्पाचे आणि या प्रकल्पात वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. देशातील एका बड्या नेत्या बरोबर त्यांचा मित्र परिवार आणि काही प्रायव्हेट बँकांचे सुमारे सव्वा सहा हजार कोटी रुपये या प्रकल्पात गुंतले आहेत. वरसगाव धऱणाच्या दुतर्फा सुमारे १० हजार एकर डोंगर दऱ्यांतून हे पर्यटन केंद्र १४ वर्षांपूर्वी उभारण्यात आले. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसविल्याचा तसेच आदिवासी बांधवांच्या जमिनी लुबाडल्याचा आरोप झाल्याने हा प्रकल्प काही काळ वादग्रस्त ठरला होता.

लवासा प्रकल्प आर्थिक दिवाळखोरीत गेल्यावर 2018 मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या आदेशानुसार लवासा प्रकल्पाची जबाबदारी रिझोल्युशन प्रोफेशनलकडे सोपवण्यात आली आहे. लवासा प्रकल्पातील मालमत्तांची विक्री करुन लवासात पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांची देणी भागवण्यासाठी रिझोल्युशन प्रोफेशनलकडून या आधी अनेक बड्या गुंतवणूकदारांना पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र अनेकदा मुदतवाढ देऊनही अद्यापपर्यंत अपेक्षित गुंतवणूकदार मिळालेला नाही.

लवासा प्रकल्पासाठी 17 बॅकांनी मिळून सहा हजार दोनशे पंचवीस कोटी रुपयांचे कर्ज दिलं आहे तर बॉन्डच्या आणि घर खरेदीच्या स्वरुपात लवासामधे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे. या गुंतवणूकदारांची देणी भागवण्यासाठी लवासा प्रकल्पातील मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.