बहिणीवर बलात्कार करणाऱ्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने लावले दोघांचे लग्न; दोघांना अटक

143

कर्नाटक, दि. १३ (पीसीबी) – राज्यातील कोलार जिल्ह्यात १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पीडित बहिणीसोबतच पतीचे लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपी पती गंगाराजू आणि पत्नी पल्लवी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गंगाराजू आणि पल्लवी हे पती-पत्नी आहेत. गंगाराजू पेंटरचा काम करत होता. काही दिवसांपूर्वी पल्लवीची १३ वर्षीय चुलत बहिण त्यांच्याकडे राहण्यासाठी आली होती. गंगाराजू याने तिच्यावर बलात्कार केला आणि कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. मात्र संपूर्ण गावात ही बातमी पसरली आणि चाइल्ड हेल्पलाइनला कळवण्यात आले. पीडित मुलीची चौकशी करण्यात आली असता तिने आधी असे काहीच झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर पल्लवीने पती गंगाराजू याला वाचवण्यासाठी पीडित बहिणीसोबतच लग्न लावून दिले. याची चाइल्ड लाइनकडे तक्रार करण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा मुलीकडे चौकशी करण्यात आली. यावेळी मुलीने संपूर्ण घटनेची माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी गंगाराम आणि त्याची पत्नी पल्लवीला अटक केली आहे.