बनावट विदेशी मद्याची विक्री करणारी टोळी मद्यासह गजाआड; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

83

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – निगडी येथील भक्ती शक्ती चौकासह शहरातील अन्य दोन ठिकाणी छापे मारून बनावट विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तिघांकडून ६ लाख २६ हजार ३४५ रुपये किमतीचा विदेशी मद्यासाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाच्या पथकाने केली आहे.  

अनंत काकासाहेब कांबळे (वय २३, रा. विनायक नगर, लेन नं.१, शॉप नं.२, आई सोसायटी , पिंपळेगुरव), भावेश परमा भासडीया (वय ३९, रा. समुद्र रेसिडन्सी, नवले कॉलेज समोर, नऱ्हे, वडगाव बुद्रूक), कानजी शामजी पटेल (वय ४९, रा. ओमकार कॉलनी, गल्ली नं. २, बालाजी निवास, पिंपळेगुरव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात बेकायदेशीरपणे विदेशी मद्याची विक्री करणारे दोघेजण येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भक्ती शक्ती चौकात सापळा रचला. दुचाकीवर दोन संशयित आल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे बनावट विदेशी मद्याच्या एक लिटर क्षमतेच्या ११ बाटल्या मिळाल्या. पोलिसांनी बनावट विदेशी मद्यासह मोबाईल फोन आणि दुचाकी असा १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी करून शिवकृपा कॉलनी, त्रिवेणी नगर, तळवडे येथे छापा मारला. या छाप्यामध्ये बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, आणि विविध विदेशी ब्रॅण्डचे बनावट मद्य बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिकाम्या बाटल्या, नविन बुचे, टोपा, लेबल्स, प्लास्टिक पट्टी, मोनोकार्टन, हेयर ड्रायर, कात्री, टोच्या, फनेल, फेव्हीक्विक, बनावट स्कॉच बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ५४ हजार ३७५ रुपयांचा ऐवज जप्त केला.

दरम्यान, सांगवी येथील हिराई हाईटस, लक्ष्मीनगर गल्ली नं. १, कदमवाडा, पिंपळेगुरूव येथे छापा मारला. या छाप्यामध्ये बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या, बनावट विदेशी मद्य तौर करण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल फोन असा एकूण १ लाख ६० हजार ७७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.  पोलिस तपास करत आहेत.