बनावट फेसबूक अकौंटद्वारे महिलांना ब्लॅकमेल

23

बारामती, दि. ८ (पीसीबी) : बनावट फेसबूकद्वारे महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश खरात या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलांशी मैत्री करुन त्यांचे अश्लील फोटो बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या संदीप सुखदेव हजारे या ठकाला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. 29 वर्षीय या युवकाने अनेक महिलांना अशाच पद्धतीने ब्लॅकमेल केल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी पुणे, नगर, संगमनेर, रत्नागिरी आदी ठिकाणीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

गणेश खरात या नावाने बनवलेल्या फेसबुक अकाउंटवरुन संदीप हजारे हा महिलांना रिक्वेस्ट पाठवायचा. त्यांनी रिक्वेस्ट स्वीकारताच हा त्यांचे अश्लील फोटो बनवून ते त्याच महिलांना पाठवून त्यांना ब्लॅकमेल करत होता. याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस नाईक परिमल मनेर, नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे या अकाऊंटचा तपास केला. त्यावेळी संदीप सुखदेव हजारे हा हे उद्योग करत असल्याचे समोर आले.

त्यानुसार, बारामती तालुका पोलिसांनी या महाठकाला सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथून अटक केली. इतकंच नाही तर पुणे शहर, घारगाव, कराड, संगमनेर आणि रत्नागिरी या ठिकाणीही याप्रकणी गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे. या आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता असून संबंधितांनी याबाबत बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.

WhatsAppShare