बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची १ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांना अटक

2817

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – बनावट कागदपत्रे तयार करून स्टेट बँक ऑफ हैद्राबादकडून १ कोटी ८ लाख रूपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील माजी नगरसेविकेच्या मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात बँकेच्या व्यवस्थापिका शृंखला जैन यांनी फिर्याद दिली होती.

या प्रकरणी गणेश राजेश वाघेरे (वय २४, रा. पिंपरी), श्रीनिवास हुबळीकर (वय २८,रा. पिंपळे सौदागर) अशी  अटक  केलेल्यांची नांवे आहेत. स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे आता स्टेट बँक ऑफ इंडियात विलीनीकरण केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुबळीकर यांनी वाकड परिसरात एक बंगला विकत घेतला होता. त्यांनी बंगल्याच्या मूळ कागदपत्रांवर निगडीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १ कोटी २ लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर २०१४ मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिंहगड रस्ता शाखेतून १ कोटी ८ लाख रूपये कर्ज घेतले होते. मार्च २०१४ ते डिसेंबर २०१५ दरम्यान हुबळीकर यांनी दरमहा हप्ते भरले. त्यानंतर हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेनी कागदपत्रांची पडताळणी केली. त्यात कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.

हुबळीकरला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता तेव्हा गणेश वाघेरेने बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत केल्याचे समोर आले.  गणेश वाघेरेला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हुबळीकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर अधिक तपास करत आहेत.