बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड

141

बदलापूर, दि.११ (पीसीबी) – बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शैलेश वडनेरे विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने त्याच रागात काही अज्ञातांनी हे कार्यालय फोडल्याचा प्रकार घडला. दरम्यान शिवसैनिकांनीच कार्यालय फोडल्याचा आरोप वडनेरे यांनी केला आहे. वडनेरे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुरबाड मतदारसंघातून शिवसेनेतर्फे इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातल्या प्रतिस्पर्ध्यांनी कार्यालय फोडलं असा आरोप आता वडनेरे यांनी केला आहे. घटनेनंतर बदलापूर शहरातलं वातावरण चांगलंच तापलं असून तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे.

बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे या दोन गटांमध्ये सध्या शिवसेनेचं राजकारण तापलं आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी दोघांमध्ये वादावादी झाली होती, या वादाचं रुपांतर अखेर धक्काबुक्कीमध्ये झालं. शैलेश वडनेरे या प्रकारानंतर दत्तवाडी येथील आपल्या कार्यालयात गणपतीच्या आरतीसाठी गेले असताना, काही शिवसैनिकांनी वडनेरे यांच्या कार्यालयात तोडफोड केली.

या सगळ्या घटनेत वडनेरे यांच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झालेलं आहे. या घटनेनंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या वामन म्हात्रे आणि शैलेश वडनेरे या दोघांचेही जवाब नोंदवण्याचं काम सुरु झालं असून, पोलीस स्टेशनबाहेर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण आहे.

हल्ला होण्याच्या काही तासांपूर्वी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्यालयात नगराध्यक्षांच्या कार्यालयात शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांची शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली होती, अशी माहिती मिळते आहे. त्या चकमकीचे पर्यावसन बाचाबाचीत झाले. या बाचाबाची नंतर आपल्या दत्तवाडी शाखेतील शेजारच्या मंडळात आरतीसाठी आले असताना त्यांच्या दत्तवाडी शाखेवर काही अज्ञात यांनी हल्ला केला. यात या कार्यालयाच्या काचा आणि साहित्याची मोडतोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाणे गाठले. यावेळी ‘मी पक्ष वाढीचे काम करत असल्याने माझ्याविरुद्ध काही शिवसेनेतील नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनीकरवी हल्ला केल्याचा आरोप शैलेश वडनेरे यांनी केला आहे. या घटनेनंतर काही तासातच वामन म्हात्रे यांना बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.

याबाबत चौकशीला जाण्यापूर्वी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना विचारले असता, शैलेश वडनेरे पक्षविरोधी काम करत असल्याचे शिवसैनिकांना समजले होते. त्यासाठी माझ्यासह इतर नेत्यांची बदनामी करत असल्याने शिवसैनिकांनी संतप्त होत ही प्रतिक्रिया दिली असल्याचे त्यांनी सांगितले.